विद्यार्थ्यांनी आवडीच्या कार्यक्षेत्रात प्रगती करावी- जिल्हाधिकारी नयना गुंडे

सामाजिक न्याय दिन व विद्यार्थ्यांचा सत्कार

 गोंदिया :  सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून माणसाला समाजातील सर्व घटकांचा मुख्य घटक मानला जातो. यामुळे समाजातील मानव हा सर्व श्रेष्ठ समाजशील प्राणी आहे. त्यामुळे समाजाचा घटक या नात्याने आपली प्रगती सर्व क्षेत्रात करावी, जे आवडीचे क्षेत्र आहे, त्याला प्रथम प्राधान्य द्या. आवडीच्या क्षेत्रात परिश्रम व अभ्यास करून नाव उज्ज्वल करा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी केले. त्या सामाजिक न्याय दिन व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. मंगेश वानखडे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी संजय गणविर, प्रा.डॉ. सविता बेदरकर, प्राचार्य खुशाल कटरे आदिवासी विद्यालय खजरी आदी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून, जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यानंतर बारावी व दहावी या बोर्डाच्या परिक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात शासकीय निवासी शाळा डव्वा येथील सेजल इंदूरकर, भैरवी उंदीरवाडे, सानिया मेश्राम, श्रेया लांडगे, तर मुर्रीचे दिक्षित सहारे, गौरव गजभिये, पियुष टेंभुर्णे, सरांडीचे कल्याणी भालेराव, आकांक्षा गौर, प्रिया उके आणि जिल्ह्यातील प्रथम अमन अग्रवाल, कैफ अन्सारी, मोहित भाववानी, अश्विन फुल्लुके, प्रांजली बहेकार, अश्विनी बिसेन, प्रेरणा बिसेन, तुषार ठाकरे या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल सन्मानपत्र श्रीफळ व रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रम हे सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणी पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मंगेश वानखडे यांनी केले. संचालन आशिष जांभूळकर यांनी तर आभार शिक्षक बगमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज कल्याण कार्यालय अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच तिन्ही निवासी शाळातील शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share