खतांच्या किमतीने शेतकरी हैराण

देवरी : जून मागील वर्षांपासून महागाई सातत्याने वाढत असून शेतीसाठी लागणार्‍या खतांच्या किमतीही वाढत आहे. यावर्षी खतांच्या किमतीत 15 ते 17 टक्के वाढ झाल्याने यंदा खरीप हंगाम अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात हजारो एकरावर शेतकरी खरीप हंगामातील धानपिकासह इतर पिकांचे उत्पादन घेण्यास तयारीस लागलेले आहेत. परंतु खरीप हंगामात शेती करण्याजोगा दमदार पाऊस अद्याप झाला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली असली तरी काही शेतकर्‍यांनी शेतीची पूर्वतयारी म्हणून मशागतीसह बि-बियाणे व खते खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र यंदा खतांच्या किमतीत 15 ते 17 टक्के वाढ झाल्याने शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर विपरित परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सध्या बाजारात विविध प्रकारच्या खतांमध्ये वाढझाली आहे. यावर्षी डीएपी खताच्या 50 किलो बॅगसाठी शेतकर्‍यांना 1900 रुपये मोजावे लागणार आहे.

मागील वर्षी याच वेळेस या खताची किमत 1300 रुपये होती. त्याआधी 1175 रुपयांमध्ये उपलब्ध होती. 15.15.15 या खताची किंमत मागील वर्षी 1 हजार रुपये होती, ती यंदा 1200 रुपये रुपये झाली आहे. 12.32.16 हे खत पूर्वी 1 हजार 250 रुपयांना मिळत होते, आता 1 हजार 800 रुपये मोजावे लागणार आहे. 20.20.20 हे खतासाठी 950 रुपयांऐवजी 1300 रुपयात विकत घ्यावे लागेल. 10.26.26 हे खत पूर्वी 1065 रुपयात उपलब्ध होते, ते आता 1400 रुपये, 18.46.00 खत 1100 रुपयाऐवजी 1700 रुपयात विकत घ्यावे लागणार आहे. सर्वच खतांच्या किमतीत यंदा वाढ झाल्याने शेतकरी वर्गाच्या अडवणीतही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Share