गटविकास अधिकाऱ्यांच्या अरेरावी वृत्तीमुळे देवरी पंचायत समितीचा कारभार वाऱ्यावर
देवरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराने कळसच गाठला असून दाखल होणा-या तक्रार,कामे व निवेदनाची वेळीच चौकशी करण्यात येत नसल्याने कोणाचेही नियंत्रण राहिले नाही.
-मनरेगाची कामे खोळंबली
- सरपंच मानधन जमा होण्यास विलंब
-अकार्यक्षम व अरेरावी बीडीओमुळे कामे थांबली, समस्या वाढल्या
प्रहार टाईम्स| भुपेन्द्र मस्के
देवरी 15: पंचायत समितीच्या ढिसाळ कारभाराने कळसच गाठला असून दाखल होणा-या तक्रार, कामे व निवेदनाची वेळीच चौकशी करण्यात येत नसल्याने कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यातच गेल्या साडेसात-आठ महिन्यापासून कोरोना असल्यामुळे गटविकास अधिकारी व कर्मचारी यांचे चांगलेच फावले. वरून प्रशासक बसल्याने लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अनियंत्रित कारभार असल्याचे चित्र देवरी पंचायत समितीत दिसुन येत आहे.
कोणाचा कोणाला पायपोस नाही. दि.१५ डिसेंबरला आदिवासी भागातील देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच प्रतिनिधी मंडळ पंचायत समितीला गटविकास अधिकारी यांना भेटावयास आले असता साध्या बसण्याची व्यवस्था येथिल गटविकास अधिकारी करु शकले नाहीत. बऱ्याचशा सरपंचाचे मानधन जमा होत नसल्याची तक्रार, व मनरेगाची कामे तातडीने सुरू करावे हि त्यांची मागणी होती. परंतु गटविकास अधिकारी यांनी आचारसंहितेचे कारण पुढे करून त्यांना फोनवरूनच हाकलुन लावल्याचे सरपंच संघटनेचे म्हणने आहे.
सरपंच संघटनेकडून गटविकास अधिकारी यांचेवर असलेली नाराजी यामुळे प्रशासन विरूद्ध शासन असा सामना रंगणार हे उघड आहे. असा सज्जड इशारा डवकी ग्रामपंचायतीचे सरपंच उमराव बावनकर यांनी दिला आहे.
गटविकास अधिकाऱ्यामुळे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही, शिस्त नाही.नागरिक व मनरेगाची कामे खोळंबली आहेत. अशा अरेरावी व अकार्यक्षम अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष संजय राऊत, उपाध्यक्ष धनराज कोरोंडे व सचिव विनोद भेंडारकर व सरपंच संघटनेकडून केल्या जात आहे.
या प्रकरणासंबधी अधिक माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी चंद्रमणी मोडक यांचेशी संपर्क साधले असता त्यांचा मोबाईल बंद अवस्थेत होता.एकूणच सारा प्रकार पाहता पंचायत समितीचा ढिसाळ कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होते.