उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवा, फिट रहा – जिल्हाधिकारी नयना गुंडे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नेहरू युवा केंद्राची सायकल रॅली

गोंदिया 04 : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या फिटनेस व योग्य आहारावर लक्ष द्यायला विसरलोच आहे. फिट राहण्यासाठी व्यायाम, सायकलिंग व स्विमिंग अतिशय आवश्यक असून आज जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने सायकल चालवू फिट राहू हा दिनक्रम अंगीकारु या असा फिटनेस सल्ला जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिला. नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर त्या सायकल पटूंशी संवाद साधत होत्या.

  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक सायकल दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र गोंदियाच्या वतीने युवकांसाठी आज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुल येथून काढण्यात आलेल्या या रॅलीला जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, जिल्हा युवा अधिकारी श्रुती डोंगरे, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा जिल्हा संघटक चेतना ब्राम्हणकर विशाल रेखारकर, सायकल असोसिएशनचे गजेंद्र फुंडे, नाजूक उईके व धरमलाल धुवारे यावेळी उपस्थित होते.

 जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट अँड गाईड, सायकल असोसिएशन, संडे सायकलिंग ग्रुप, युवा एकता बहुउद्देशीय संस्था व स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक सायकल दिवसाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या या रॅलीत स्वच्छ पर्यावरण, सायकलिंग व फिटनेसचे महत्व पटवून देण्यात आले. या रॅलीचा समारोप इंदिरा गांधी स्टेडियम येथे करण्यात आला.

रॅली यशस्वी करण्यासाठी रितुराज यादव, अंकुश गजभिये, पूनम दमाहे, मेघा मालडोंगरे, रवी सपाटे, तोपेश सावरकर, अंकुश कोरे, भोजराज रहांगडाले, सिद्धार्थ अंबुले, विनेश पुंडे व मोहित पटले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन युवा अधिकारी श्रुती डोंगरे यांनी केले. या रॅलीत सायकल प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Share