तलाव आटल्यामुळे मासेमारांवर आली उपासमारीची वेळ, मासेमारी व्यवसाय संकटात

देवरी 04: यावर्षीच्या उन्हाळ्यात सूर्याने आग ओकणे सुरु केले आहे. तालुक्यातील तापमान 43-44 अंशावर गेल्यामुळे तलाव छोटे जलसाठे यामधले पाणी आटले असून तालुक्यातील नदी-नाल्यांना कोरडे पडलेले आहेत. यावर्षी उन्हाळी हंगामात मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून अति तापमानामुळे मासेमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील नाल्यातील पाणी तसेच तलावातील पाणी आटल्याने मासेमारीवर अवलंबून असलेल्या मासेमार बांधवांचे व्यवसाय डबघाईस आलेले आहे.

उन्हाळ्यात मासे न मिळत असल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. काही तलावात पाणी नसल्याने मासोळ्या मृत पावल्यामुळे मच्छीपालन संस्थाही आर्थिक संकटात सापडल्या आहेत. कर्ज काढून मासोळी बिजांची खरेदी केली जाते. मात्र मासोळ्याचा उन्हाळ्याच्या कडक तापमानाने उत्पादन होत नाही. परिणामी आर्थिक नुकसान होत असल्याचे ढिवर भोई बांधव समाज सांगत आहेत. ढिवर भोई समाजाचे जिवनमान या मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र या व्यवसायावर आलेल्या अवकाळी संकटामुळे या समाजापुढे स्वतःचा व परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा असा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

Share