शासकीय धान खरेदी केंद्राचा मुहूर्त निघेना
गोंदिया: जिल्ह्यातील शेतकर्यांनी रब्बी हंगामातील धानाची कापणी केली. बहुतेक शेतकर्यांनी मळणी देखील केली आहे. कुणाचे धान घरी, तर कुणाचे शेतात पडून आहे. परंतु, अद्यापही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु झाली नाहीत. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली असून आता पावसाळ्यात धान खरेदी केंद्र सुरु करणार काय? असा संतप्त प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
जिल्हा मार्केटिंग विभागाकडून 107 केंद्राना धान खरेदीकरिता मंजुरी देण्यात आली आहे. मात्र केवळ बोटावर मोजण्याइतकेच म्हणजे चार धान खरेदी केंद्र सुरु झाल्याची माहिती आहे. उर्वरित धान खरेदी केंद्रे कधी सुरु होतील, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या स्थितीत शेतकर्यांनी धानाची कापणी करुन मळणीची कामे सुरु केली आहे. बहुतेक शेतकर्यांची मळणीही आटोपली आहे. मात्र मागील काही दिवसापासून अधूनमधून येणार्या पावसाच्या सरींमुळे पावसापासून धान वाचविण्याची तसेच धान सुरक्षीत ठिकाणी साठवून ठेवण्यासाठी शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच खरीप हंगाम तोंडावर आला असूनही हातात पैसा नसल्याने शेतीच्या मशागतीसह नांगरणी, बि-बियाण्यांची जुळवाजुळव करताना शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
अशा परिस्थितीत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रे त्वरीत सुरु होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रशासकीय यंत्रणेचे घोडे केंद्रे सुरु करण्यास अडले आहे. परिणामी अडलेला शेतकर्यांना आपले धान खासगी व्यापार्याला कमी दराने विकावे लागत आहे. त्यातच धान विक्री करताना व्यापारी सातबाराची मागणी करीत असल्याने नाईलाजास्तव शेतकर्यांना सातबारा उतारा द्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, शेतकर्यांचे कैवारी म्हणून घेणार्या लोकप्रतिनिधींचेही शेतकर्यांच्या व्यथेकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरी शासन, प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत असून तातडीने धान खरेदी केंद्रे सुरु करण्याची मागणी करीत आहे.