देवरी तालुक्यात पदाधिकारी व कार्यकर्तेच बनले ठेकेदार, मंत्रालयात सेटिंग करणारा ‘तो’ ठेकेदार कोण ? सवाल जनतेचा

◾️ग्रामीण भागात भ्रष्टाचारासह कामाचा दर्जाही खालावला, कामांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत, जनता कारवाईच्या प्रतीक्षेत

देवरी 29– तालुक्यातील विविध निधीतील कामे मंजूर झाली असून जोरदार कामांना सुरुवात झालेली आहे आणि बरेच कामे पूर्ण करून बिले सुद्धा काढण्यात आलेले आहेत. मंजूर झालेले कामे मिळवण्यासाठी राजकीय पुढारी पदाधिकारी व कार्यकर्तेच ठेकेदार झाले असल्याचे देवरी तालुक्यातील चित्र आहे. राजकीय वरदहस्तामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला असून, परिणामी निकृष्ट कामे होत असल्याची ओरड तालुक्यातील जनतेची आहे. काही ठेकेदार झालेले कार्यकर्ते विकास होऊ द्या म्हणून स्वत:चाच खिसा गरम करीत आहेत. विशेष असे की या सर्व कथित ठेकेदारांना कुणाचा आशिर्वाद आहे असा नागरिकांचा सवाल आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत सुशिक्षित ग्रामस्थांनी विचारणा केल्यास आपल्या ठेकेदाराची मंत्रालयात सेटिंग आहे. अधिकारी व कर्मचारी आमचा काहीच करू शकत नाही अशा भाषेचा आणि मंत्रालयाच्या नावाचा वापर करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. यावेळी ‘आमचा ठेकेदार लयी पॉवरफुल’ असे सर्रास सांगतले जात आहे. मंत्रालयात सेटिंग करणारा हा ठेकेदार कोण असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे. काही पुढारी “इकडून तिकडे व तिकडून इकडे’ असे पक्षात उड्या मारून स्वतःची ठेकेदारी करीत आहे. तर काही कार्यकर्ते स्वत:लाच लोकप्रतिनिधी समजून थाटात ठेकेदारी करीत आहे. ठेकेदारीसाठी दुसऱ्यांच्या नावाचा वापर करीत आहेत . तसेच ठेकेदारी करणाऱ्या अनेक कंत्राटदारांजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नसून दुसऱ्याच्या नावावर कामे घेऊन ते ठेकेदारी करीत असल्याचे वृत्त आहे.

सदर भ्रष्टाचार करणाऱ्या पदाधीकारी , कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ता यांच्या निष्कृष्ट कामावर लगाम न घातल्यास देवरी तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचा सत्यानाश झाला शिवाय राहणार नाही.

Share