देवरीच्या आदिवासी भागातील तरुणाने काढली चक्क 25 बैलगाड्यातून वरात , आदिवासी संस्कृती जपण्याचा दिला संदेश

देवरी 26: आदिवासी नक्षलग्रस्त भाग म्हणून गोंदिया जिल्हाची ओळख आहे. बहुतांश डोंगराळ आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या या आदिवासी ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात आदिवासी जमातीचे लोक वास्तव्य करतात. दिवसेंदिवस पाश्चिमात्य संस्कृतीने लग्न कार्य आणि आपल्या पारंपारिक संस्कृतीवर प्रभाव पडलेला असून आजची तरुण पिढी परंपरा आणि संस्कृतीला विसरत चालत असतांना एका लग्न सोहळ्यात तरुणाने चक्क 25 बैलगाडीच्या मदतीने वरात काढून
आदिवासी लोकनृत्य, लोकगीतावर भन्नाट नृत्य करीत बैलगाडीत वरात काढीत पाहुण्यांचे आणि आदिवासी भागातील लोकांचे लक्ष वेधले आहे.

देवरी तालुक्यातील कडीकसा (गणुटोला) येथील आदिवासी तरुण देवराज भागीराम कुंभरे यांचा लग्न तालुक्यातील वांढरा येथील टिकाबाली यांच्या सोबत आज थाटात पार पडले आहे. या लग्न सोहळ्यात जाणारी वरात ही कार-बस ने नाही तर तब्बल 25 बैलगाड्यामध्ये निघाली त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरला आहे. रूढी परंपरा व संस्कृती प्रमाणे देवराज यांने टीकाबाली सोबत थाटात लग्न केले आहे.

दिखाव्याचे ढोंग बाजूला सारत देवरी तालुक्यातील कडीकसा येथील देवराज कुंभरे या तरूणाने आपल्या लग्नात वाहन, ना कर्णकर्कश डीजे न ठेवता तब्बल 25 बैलबंड्यांतून 10 किलोमीटर वरात काढली. आदिवासी रीती रिवाज व संस्कृती प्रमाणे लग्नाच्या वरातीत फक्त आदिवासी लोकगीत सादर करण्यात आले. तसेच लोप पावत चाललेली कला या लग्नात सादर करण्यात वर्हाडीही आदिवासी नृत्यावर थिरकले. हा विवाह सोहळा आदर्श ठरला असून आपली लोकपरंपरा जीवंत ठेवण्याकरिता हा निर्णय घेतला असल्याचे देवराज कुंभरे या तरूणाने सांगितले.

Share