गोंदियात 50 हजार मातांना मातृवंदन योजनेचा लाभ

गोंदिया: मातामृत्यू, बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला कोरोना काळातील टाळेबंदीतही चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 46,600 मातांची प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत नोंदणी झाली आहे. 2 मेपर्यंत 50,049 मातांच्या बँक खात्यावर 22 कोटी 47 लाख 91 हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे. जिल्ह्यात 107 टक्के मातांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत 1,48,144 अर्ज प्राप्त झाले. 1,36,362 माताना अर्जानुसार या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. योजनेमुळे महिलांची बँक खाते संख्या वाढली आहे. बाळाच्या लसीकरणाचे प्रमाणही वाढले आहे. दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक गरोदर महिला ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा मातांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत व प्रसूती झाल्यावर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी रोज मजुरी करीत असताना अधिक शारीरिक क्षमतेचे काम केल्यामुळे अशा मातांची बालके कमी वजनाची जन्माला येतात व कुपोषणाचे सत्र मातेपासून बालका पर्यंत ओढवले जाते. याची दखल घेत शासनाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केलेली आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या आधार बँक खात्यात तीन टप्प्यांमध्ये 5 हजार रुपये अदा केले जातात.

योजनेसाठी लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, लाभार्थ्यांच्या आधार कार्डची जोडलेले बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसाच्या आत नोंदणी, बाळाचा जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरणाच्या प्रत्येकी आवश्यकता असते. शासकीय अथवा निमशासकीय सेवेतील तसेच खाजगी नोकरीतील ज्या मातांना पगारी प्रसूती रजा मंजूर आहे, अशा मातांना ही योजना लागू होत नाही. मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीत आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, सेवक, आरोग्य सहाय्यक, सहायीका हे लाभार्थ्यांना प्रेरित करीत असून तालुका कार्यक्रम सहाय्यक, तालुका समूह संघटक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा समूह संघटक, जिल्हा कार्यक्रम सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी हे सर्व डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांच्या सहाय्याने अर्ज भरून घेण्याकरिता मदत करतात.

Share