पशुधन विकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी / गडचिरोली : चामोर्शी पंचायत समिती कार्यालय पशुसंवर्धन विभाग, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) सागर पोपट डुकरे, वय ३२ वर्षे यांना १० हजार रूपयांची लाच स्विकारतांना ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोलीच्या पथकाने रंगेहात पकडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील रहिवासी असुन शेतीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांना एक हजार मांसल पक्षी कुकूटपालन योजनेचा लाभ देण्याचा कामाकरीता आरोपी सागर पोपट डुकरे, वय ३२ वर्षे पद- पशुधन विकास अधिकारी (विस्तार) वर्ग-१, पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती चामोर्शी, ता.चामोर्शी जि. गडचिरोली यांनी १० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती. तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन रितसर तक्रार नोंदविली. शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. गडचिरोली यांनी तक्रारदाराने दिलेल्या तकारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) वर्ग -१ सागर पोपट डुकरे यांनी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना एक हजार मांसल पक्षी कुकुटपालन योजनेचा लाभ देण्याचा कामाकरिता १० हजार रूपये लाच रक्कमेची सुस्पष्ट मागणी केली. सागर पोपट डुकरे यांना तक्रारदार यांचेकडून १० हजार रूपये लाच रक्कम मौजा चामोर्शी पंचायत समिती कार्यालय मेनगेट जवळ स्विकारतांना रंगेहात पकडले. पशुधन विकास अधिकारी सागर पोपट डुकरे यांचे विरूध्द पोलीस स्टेशन, चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक मधुकर गिते, ॲन्टी करप्शन ब्युरो नागपूर, पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड, ला.प्र. वि. गडचिरोली यांचे मार्गदर्शनात पोनि ” शिवाजी राठोड, पोनि श्रीधर भोसले, सफौं प्रमोद ढोरे, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना. राजेश पदमगिरवार, श्रीनिवास संगोजी, पोशि संदीप घोरमोडे, मपोशि ज्योत्सना वसाके, चापोना स्वप्नील वड्डेटीवार सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share