किरकोळ बाजारात एक लिंबू तब्बल 15 रुपयांना!

नागपूर : आंबट चवीच्या लिंबाला विक्रमी दर मिळत असल्याने राज्यातील शेतकरी वर्गाकडून लहान तसेच कच्च्या लिंबाची तोड करून बाजारात विक्रीस पाठविण्यात येत आहे. रसाचे प्रमाण कमी तसेच प्रतवारी घसरलेल्या स्थानिक लिंबाची खरेदी करण्याकडे पुणेकरांनी पाठ फिरविली आहे, तर याउलट रसदार हैदराबादी, चेन्नईच्या लिंबाच्या खरेदीकडे कल वाढल्याचे चित्र आहे. या लिंबांना प्रति नग तब्बल १० ते १५ रुपये भाव मिळत आहे.

बाजारात महाराष्ट्रातून नगर, सोलापूर येथून स्थानिक लिंबाची आवक होत आहे, तर परराज्यातून हैदराबादपाठोपाठ आता चेन्नई येथून लिंबांची आवक सुरू आहे. सद्य:स्थितीत बाजारात दररोज 700 ते 1200 गोण्यांची आवक होते. एरवी हीच आवक दोन ते 3 हजार गोण्यांची होत असते. घाऊक बाजारात लिंबाच्या 15 किलोंच्या एका गोणीस प्रतवारीनुसार 600 ते 2000 रुपये दर मिळत आहे, तर किरकोळ बाजारात एका नगाची दहा ते पंधरा रुपयांना विक्री केली जात आहे.

दोन आठवड्यांपुर्वी लिंबांच्या गोणीचे कमीत कमी भाव 1500 रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, लिंबाच्या बागांना पाणी कमी पडत असल्याने स्थानिक लिंबाची आवक घटली आहे. बाजारात येणार्‍या स्थानिक लिंबामध्ये हिरव्या आणि खराब प्रतीच्या लिंबाचे प्रमाण अधिक असल्याने गोणीचे भाव सहाशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

Share