गाय व म्हशीच्या अनुदानात राज्य सरकारकडून मोठी वाढ

मुंबई: शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पशूपालन करतात.. दूध उत्पादनातून शेतकऱ्याचा घरखर्च चालवला जातो.. त्यामुळे चांगल्या दूध उत्पादनासाठी पशूपालक जातीवंत गाय व म्हैस घेताना दिसतात. गेल्या काही दिवसांत जनावरांच्या किंमतीत प्रचंड मोठी वाढ झालीय. अशा वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देते.

महाराष्ट्रातील पशूपालकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे.. महाराष्ट्र शासनाने दुधाळ जनावरांच्या वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजनेत गाय व म्हैस जनावरांसाठीच्या अनुदानात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रस्तावानुसार, आता गायीसाठी 60 हजार, तर म्हैस घेण्यासाठी 70 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

सध्या हा प्रस्ताव राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाने नियोजन विभागाकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सरकारी दरबारी दुधाळ पशूधनाचा भाव वाढणार असून, त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

पशुपालन व दुग्ध व्यवसाय विकास विभागातर्फे दुधाळ जनावरांसाठी वैयक्तिक लाभार्थी योजना राबवली जाते. त्यानुसार, गाय, म्हैस घेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेत जास्तीत जास्त दोन गायी अथवा दोन म्हैस खरेदीसाठी अनुदान दिलं जातं. त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो..

अनुदानाची रक्कम अपुरी
सध्या या योजनेतून गाय व म्हशीसाठी प्रत्येकी 40 हजार रुपयांचे अनुदान दिलं जातं. अनुदानाची ही रक्कम 2011 मध्ये निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 10 वर्षांत महागाईबरोबर पशुधनाच्याही किमती वाढल्या आहेत. मिळणारे अनुदान व जनावरांच्या किंमतीचा विचार केल्यास, त्यामध्ये खूपच मोठा फरक असल्याचे दिसते..

अनुदानाची रक्कम अपुरी असल्याने जनावरे खरेदी करण्यासाठी बऱ्याचदा लाभार्थ्यांना पदरचे पैसे घालावे लागत होते.. ही बाब लक्षात आल्यानंतर पशुपालन व दुग्ध विकास विभागाने गायीसाठी 20000 हजार, तर म्हशीसाठी 30000 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता गायीसाठी 60 हजार रुपये, तर म्हशीसाठी 70 हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share