गुड न्यूज : गोंदिया जिल्हात भूजल पातळीत वाढ
गोंदिया 28: यावर्षी जिल्ह्यात सरासरी 1300 मिलि पाऊस होता. परंतु पावसाचे पाणी जमिनीत मुरावे, यासाठी विशेष प्रयत्न अद्याप झाले नाही. परिणामी पावसाचे पाणी नदी व नाल्याद्वारे वाहून जाते. मात्र यंदाच्या मोसमात उशिरापर्यंत बरलेल्या पावसामुळे जिल्ह्याच्या भूजल पातळीत चार महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पाच वर्षातील सरासरीचा विचार करता ही वाढ 0.59 मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. भूजल विकास व सर्वेक्षण यंत्रणेच्या पाहणीतून ही समाधानकारक बाब पुढे आली आहे.
जिल्ह्यात पडणार्या पावसाची सरासरी चांगली आहे. परंतु भूगर्भात पाणी साठविण्याची यंत्रणा नसल्यामुळे जिल्ह्यात पाणी भूगर्भात मुरत नाही. उलट ते नदी व नाल्यावाटे वाहून जाते. यामुळे दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी जमिनीत पुरविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अलिकडच्या काळात तीनशे ते चारशे मीटर खोल बोअरवेल खेदूर पाण्याचा उपसा करण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे बोअरद्वारे होणारी भूगर्भाची चाळण बंद करण्याचीही गरज आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्या माध्यमातून मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात असे सर्वेक्षण करण्यात येते. जानेवारी, मार्च, मे व ऑक्टोबर महिन्यात हे निरीक्षक केले जाते.
यंदा जिल्ह्यातील 33 पाणलोट क्षेत्रातील 79 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. यात चार महिन्यानंतर जानेवारी 2022 मध्ये भूजल पातळीची 0.59 मीटर नोंद घेण्यात आली होती. गेल्यावर्षीच्या निरीक्षणात ही नोंद 0.53 मीटर एवढी होती. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील भूगर्भातील वाढ झाल्याचे समोर आले आहे. ही पातळी कायम राखण्यासाठी भूगर्भातील पाणी उपसा आटोक्यात ठेवावा, दोनशे फुटापेक्षा अधिक खोल बोलरवेल खोदू नये, असे आवाहन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक सचिन खोडे यांनी केले आहे.
रिक्तपदांचा यंत्रणेला ग्रहण
गोंदिया जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण कार्यालयात रिक्तपदांची संख्या अधिक आहे. या विभागात 2018 पासून वरिष्ठ भूवैज्ञानिकाचे पद रिक्त आहे. विभागासाठी 17 पदे मंजूर असली तरी सध्या सात भरली आहेत. यातील दोन पदे परिचर व वाहनचाकांची आहे. सहायक भूवैज्ञानिकाकडे वरिष्ठ पदाचा भार आहे. तर कनिष्ठ भूवैज्ञानिकाचे पद रिक्त आहे. या विभागामार्फत जिल्ह्यात पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. कंत्राटी कर्मचारी प्रयोगशाळेतील कामकाज सांभाळत आहेत.