Gondia: उन्हापासून भाजीपाला वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

गोंदिया: जिल्ह्यात शेतकरी आता धान पीकासोबतच रब्बी हंगामात भाजीपाला उत्पादन घेत आहेत. सध्या भाजीपाला वर्गीय पिकांना उन्हाचा फटका बसत आहे. भाजीपाला वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहेत. दुपारी भाजीपाल्याला सावली देण्याची व्यवस्था तर सायंकाळी पाणी देऊन वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गोंदिया जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. परंतु धानपिकातून पाहिले त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नसल्यामुळे बहुतांश शेतकरी आता भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले असून शेतकर्‍यांना या पीकांकडून मोठी अपेक्षा आहे. अनेक शेतकर्‍यांकडे सिंचनाची व्यवस्था असल्याने यंदाही मोठ्या प्रमाणात भाजीपाला पीकाचे उत्पादन घेत आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळेस भाजीपाला पीक माना टाकत असून पाणी न मिळाल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी दुपारच्या वेळी पीकाला सावलीची तर सायंकाळी पाणी देऊन पीक जगविण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. 

वाढत्या उन्हामुळे पालेभाज्या तग धरणे कठीण झाले आहे. त्यामुळे कोथींबीर, पालक, मेथी, लालभाजी, आंबाडी आदी पालेभाज्यांची आवक कमी झाली असून दरही वाढले आहे. एक महिन्यापूर्वी 10 ते 20 रुपये किलोप्रमाणे मिळणार्‍या या पालेभाज्या आता 40 ते 60 रुपये किलोप्रमाणे विकत घ्याव्या लागत आहेत.

Share