गोसेखुर्दच्या जलपूजनाला शरद पवार-गडकरी एकत्र

भंडारा-तब्बल ३८ वर्षांपासून काम सुरू असलेल्या राज्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे जलपूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ३ मे रोजी होणार आहे.

विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील इंदिरा सागर म्हणजेच गोसेखुर्द प्रकल्पामुळे भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला लाभ होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी २२ एप्रिल १९८४ रोजी केले होते. गुरुवारी याला ३८ वर्षे झाली. धरणात एकूण क्षमतेच्या १०० टक्के म्हणजे २४५.५० मीटर जलसाठा करण्यात आला आहे. ३ मे रोजी होणाऱ्या जलपूजनाची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाला दरवर्षी पुरेसा निधी मिळाला नाही. तसेच कामातील दिरंगाई, गैरव्यवहारचे आरोप आणि त्याची चौकशी, या कारणांमुळे हा प्रकल्प रखडला. त्यानंतर दोन वर्षे करोनामुळे कामाची गती मंदावली. आता परत या प्रकल्पाच्या कामाने गती घेतली आहे. पुरेसा निधी मिळाल्यास आणि वन विभाग तसेच रेल्वे खात्याने वेळेत मान्यता दिल्यास जून २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या प्रकल्पावर गेल्या ३८ वर्षांत १४,२५१ कोटी रुपये खर्च झाल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात म्हटले होते. या प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता १८,५०० कोटी रुपये आहे. १९८४ मध्ये प्रकल्पाची किंमत ३७२ कोटी रुपये होती. राज्य सरकारने यंदा अर्थसंकल्पात ८५३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही तरतूद पुरेसी नाही. महामंडळाला चालू वर्षांत आणखी किंमान ५०० कोटी रुपये हवे आहेत. या प्रकल्पाचा सुमारे ३५ लाख नागरिकांना लाभ होणार आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन २२ एप्रिल १९८४ केले होते. त्याला आज ३८ वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यानच्या काळात या प्रकल्पातून एक लाख ३० हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती झाली आहे. मागच्या वर्षी ७५ हजार हेक्टरमध्ये प्रत्यक्ष सिंचन करण्यात आले. तर यावर्षी एक लाख हेक्टर प्रत्यक्ष सिंचन करण्याचे उद्दिष्ट विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे आहे.

Share