सन्मान’च्या अनुदानाची शेतकर्यांना प्रतिक्षा
गोंदिया: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकर्यांना वर्षाकाठी सहा हजारांचे अनुदान दिले जाते. या योजनेमुळे शेतकर्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे. मात्र, नवीन शेतकर्यांना नावनोंदणी करण्यासाठी अडचणी येत आहेत. शिवाय काहींची नावनोंदणी करुनही त्यांना अद्याप लाभ मिळाला नाही. शेती खरेदी केलेले शेतकरी, मयत असलेल्या शेतकर्यांचे वारसदार, विधवा महिला, काही कारणास्तव ज्यांना नोंदणी करता आली नाही, अशा शेतकर्यांना लाभ केव्हा मिळणार, असा प्रश्न लाभार्थींतून व्यक्त केला जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात अनेक शेतकर्यांना नोंदणी करण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे त्यांना सहा हजारांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या लाभ मिळत नसल्याने शेतकर्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. पीएम किसान पोर्टलवर ऑनलाईन नवीन शेतकर्यांना नोंदणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील शेतकर्यांना याबाबत माहितीचा अभाव असल्याने त्यांना नोंदणी करता येत नसल्याचे चित्र आहे. तसेच आपले सरकार केंद्रावर नोंदणी होत नसल्याने शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकरी तहसील कार्यालयात खेटे घेत आहेत. मात्र तेथेही मार्ग निघत नसल्याने शेतकर्यांचा हिरमोड होत आहे. तहसील कार्यालय स्तरावरही याबाबत काहीच उपाययोजना होत नसल्याने शेतकर्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. नवीन शेतकर्यांना नावनोंदणीसाठी तलाठी स्तरावर मोहिम राबवावी किंवा आपले सरकार पोर्टलवर सेवा सुरु करावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.
पीएम किसान योजनेच्या नावनोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल व इंटरनेट नेटवर्क हे बिनभरोशाचे आहे. त्यामुळे काही शेतकर्यांकडे ही साधने उपलब्ध असूनही त्याचा लाभ घेता येत नाही. परिणामी त्यांना या कामासाठी मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. यावरही प्रशासनाने तोडगा काढणे गरजेचे आहे.