कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांच्या पाठीशी भावासारखे उभे रहा

Covid

गोंदिया: घरातील कर्ता माणूस कोविडमुळे गेला हे दुःख त्या महिलेसाठी डोंगराएव्हढे आहे. अधिकारी म्हणून आपण अशा प्रकरणांमध्ये संवेदनशील होऊन काम करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध विभागाच्या योजना या विधवा भगिनींना प्राधान्याने मिळायला हव्यात. कोविड प्रकोपामुळे विधवा झालेली महिला ही आपली बहिणच आहे या भावनेने त्यांच्या पाठीशी उभे राहून आपल्यातील संवेदनशीलतेचा परिचय करून द्या, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सर्व यंत्रणांना केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 21 एप्रिल रोजी आयोजित ‘मिशन वात्सल्य’ योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मागील दोन वर्ष सर्व जगाने कोरोना या संसर्गजन्य आजाराशी लढा दिला. या लढ्यात अनेकांनी आपले स्वकीय व आप्त गमावले. गोंदिया जिल्ह्यातील 304 महिलांनी आपले पती या महामारीत गमावले. अशा एकल किंवा विधवा झालेल्या महिलांसाठी शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार मिशन वात्सल्य योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली होती. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना विविध विभागामार्फत राबविल्या जातात.

अशा योजनांचा लाभ या महिलांना प्राधान्याने देण्यात यावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. आदिवासी विकास विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजनांचा लाभ या माता भगिनींना देण्यात यावा. ज्या महिलांवर असा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या महिला आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत अशावेळी आपण स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची मदत करणे हाच ‘मिशन वात्सल्य’ योजनेचा खरा उद्देश आहे. या योजनेत काय प्रगती झाली याचा दर गुरुवारी आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाने लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय यादी प्रत्येक गुरुवारी सादर करावी असे निर्देश खवले यांनी दिले. तसेच पुढील बैठकीत लाभार्थी व योजना निहाय आढावा घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share