गुडन्यूज: गोंदियाच्या रक्तपेढीत मुबलक रक्तसाठा

गोंदिया: कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने व निर्बंध शिथिल झाल्याने यंदा सर्वधर्मीय सण, उत्सवानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन होत आहे. यातंर्गत आतापर्यंत रक्तदान शिबिरे अनेक ठिकाणी आयोजित झाले. त्यामुळे शासकीय रक्तपेढीत सद्यस्थितीत मुबलक रक्तसाठा जमा होत असून सध्या 208 युनिट रक्ताचा साठा आहे.

जिल्ह्यातील 14 लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी एकमेव गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणाखाली स्थानिक बाई गंगाबाई महिला रुग्णालयात शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीच्या माध्यमातून गरजुंना रक्तपुरवठा केला जातो. विशेषतः दररोज 30 ते 35 युनिट रक्त गरजुंना उपलब्ध करुन दिले जाते. मात्र बहुतांश वेळा रक्तपेढीत मागणीनुसार रक्त उपलब्ध होत नसल्याची माहिती समोर येते. विशेष म्हणजे, दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान शिबिर होत नसल्याने रक्ताचा तुटवडा भासत असतो. मात्र यंदा दोन वर्षानंतर कोरोना निर्बंध संपूर्णपणे उठल्याने विविध सण, उत्सवात आयोजकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेतले.

या शिबिरात संकलीत केलेले रक्त हे शासकीय रक्तपेढीला देगणी म्हणून उपलब्ध करुन देण्यात आले. सद्यस्थितीत रक्तपेढीत 208 युनिटचा साठा आहे. ज्यामध्ये ए-पॉझिटिव्ह 34 युनिट, बी पॉझिटिव्ह 80, एबी पॉझिटिव्ह 16, ओ पॉझिटिव्ह 78 युनिट रक्तसाठा आहे. दरम्यान, जनसंपर्क अधीक्षक प्रेरणा धनवीर यांनी, सामाजिक, धार्मिक व अन्य संस्थांशी संबंधित रक्तदात्यांनी गरजुंना वेळेवर रक्तदान करुन शासकीय रक्तपेढीला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Share