तर बुलडोझरचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रस्त्यावर उतरतील

योगी सरकारला राकेश टिकैत यांनी दिला इशारा

नवी दिल्ली – भारतीय किसान युनियनचे (BKU) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. दहा वर्षे जुने ट्रॅक्टर उद्ध्वस्त करण्याचा विचार सरकारने केला तरी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर योगी सरकारच्या बुलडोझरला सामोरे जातील आणि या लढाईत विजयही फक्त शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचाच  होईल.

राकेश टिकैत शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कार्यालयात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, देशात महागाई वाढत असून उत्पन्नात सातत्याने घट होत आहे. महागाई रोखण्यासाठी सरकार ना कुठली योजना आखत आहे ना रोजगाराच्या संधी वाढवत आहे, उलट अशी कामे करण्यात गुंतले आहे, त्यामुळे लोक त्रासले जातील.

सरकारने आता शेतकऱ्यांना 3 महिन्यांत 10 वर्षे जुने ट्रॅक्टर बंद करण्याचा इशारा दिला आहे. पण, शेतकऱ्याचा ट्रॅक्टर उद्ध्वस्त झाला तर शेती कशी करणार? नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पुरेसे पैसे नाहीत. दहा वर्षे जुने ट्रॅक्टर नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तर शेतकरी गप्प बसणार नाहीत. रस्त्यावर उतरतील. बुलडोझरसमोर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर उभा राहील. याआधी दिल्लीत चार लाख ट्रॅक्टर जमा करून शेतकऱ्यांनी सरकारला ताकद दाखवली आहे, हे विसरू नये.

राकेश टिकैत म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या कृतींविरोधात कोणीही आंदोलन करू नये म्हणून बुलडोझरचा धाक लोकांना दाखवला जात आहे. या बुलडोझरचा धाक शेतकऱ्यांना दाखविण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर हे बुलडोझर फोडण्याचे काम करतील. देशात आणि राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे, महागाई सातत्याने वाढत असून सरकार बुलडोझर-बुलडोझर खेळण्यात मग्न आहे.

इकडच्या तिकडच्या गोष्टी बाजूला ठेवून सरकारने महागाई रोखण्यावर भर दिला पाहिजे. डिझेल आणि विजेच्या दरात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या खर्चात वाढ झाली असून, त्यांच्यासमोर उपजीविकेचे संकट उभे राहिले आहे.अशा स्थितीत दहा वर्षे जुने ट्रॅक्टर नष्ट करण्याबाबत सरकारला बोलणे शोभत नाही.

दिल्लीतील जहांगीरपुरी येथे झालेल्या बुलडोझरच्या कारवाईबाबत राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका विशिष्ट धर्माच्या लोकांवर ज्या प्रकारे बुलडोझरव्दारे कारवाई चालू आहे , ती कारवाई भारताच्या भविष्यासाठी अत्यंत वाईट आहे. अशा घटनांमुळे भारताची जगभरात बदनामी होत आहे.

Print Friendly, PDF & Email
Share