खासदार नवनीत राणा यांना “Y” श्रेणीची सुरक्षा, मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्यास ठाम

मुंबई – केंद्रीय गृह मंत्रालयाने खासदार नवनीत राणा यांना केंद्रीय सशस्त्र व्हीआईपी सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली आहे, यावरून शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राणा यांना “वाय” श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर राणा दाम्पत्य हनुमान चालिसाचे पठण करण्यावर ठाम आहेत. नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत आणि त्यांचे पती रवी राणा हे विदर्भातील बडनेरामधून अपक्ष आमदार आहेत. रवी राणा यांनी बुधवारी सांगितले होते की, ते 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करतील. ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान वांद्रे पश्चिम उपनगरात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्याने अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीवर निर्धार व्यक्त केला. यावेळी रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली.

रवी राणा म्हणाले, मातोश्रीवर हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी. राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालिसा वाचल्यानंतर दूर होईल. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत.

दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केले असते. तर, एक वेळा नाही 100 वेळा वाचायला सांगितले असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकरांना कुठलही त्रास देणार नाही. आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, असेही त्यांनी म्हटले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे जर शिवसैनिक असते तर त्यांनी आमच्यासोबत हनुमान चालीसा पठण केले असते. बजरंगबलीचे नाव घेऊन मी येथे आलो आहे. शिवसैनिकांनी धमकी दिली होती, मुंबईत पाय ठेऊन दाखवा. त्यांना सांगू इच्छितो की अरे मी मुंबईत आलो आहे. हनुमान चालिसा वाचल्याने मी इथपर्यंत आलो असल्याचे रवी राणा यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share