देवरीत उड्डाण पुलासाठी भाजप विद्यार्थी मोर्चाने दिले निवेदन

प्रहार टाईम्स
देवरी शहर हे तालुक्याचे ठिकाण असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वसलेले आहे. येथे अनेक शाळा व कॉलेज असून शिक्षण घेण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी येणे – जाणे करतात.
त्यामुळे, राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल नसल्यामुळे महामार्गावरील अनेक चौकात वाहनांची आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची खूप वर्दळ असते. या वर्दळीमुळे अनेक वर्षांपासून अनेक समस्यांना नागरीक आणि विद्यार्थी तोंड देत असून अनेक अपघात सुद्धा झाले आहेत. आणि पुढे भविष्यात सुद्धा अशा समस्या व घटना टाळता येणार नाहीत.
या सर्व बिंदूंचा विचार करुन राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पूल ताबडतोब तयार करण्यासाठी भारतीय जनता पक्ष विद्यार्थी मोर्चा तालुका देवरीच्या वतीने देवरी नगर पंचायतचे नगराध्यक्ष संजय उईके यांना काळाची गरज बघून नगर पंचायतच्या सभेत प्रस्तावपास करण्यासाठी तसेच वरच्या शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी आज १९ एप्रिलला निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना भाजप विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष दिशांत चन्ने, मार्गदर्शक दिनेश भेलावे, महामंत्री देवेंद्र गायधने, हितेश हटवार, सदस्य धिरज तिरपुडे, राहुल मरस्कोल्हे आणि प्रेशीत चचाणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share