Gondia: कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार

◼️गोंदिया जिल्हातील 63 शाळावर टांगती तलवार

प्रहार टाईम्स वृत्तसेवा

गोंदिया: राज्यातील 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्याचा गतवर्षी घेण्यात आला होता. त्याला विरोध झाल्यानंतर तो थांबवण्यात आला. मात्र आता पुढील वर्षी सुरू होणार्‍या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत या कमी पटसंख्येच्या शाळांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तर मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील 63 शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या 10 पेक्षा कमी आहे. विदर्भात 1 हजार 117 शाळांमध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्या हा निकष निश्चित करण्यात आल्याने कमी पटसंख्येच्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. त्यामुळे या शाळा आता इतर शाळांमध्ये समायोजित करताना विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचे धोरण शिक्षण विभागाने स्विकारले आहे. त्यामुळे कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळांना पूर्णविराम मिळणार आहे. नविन शैक्षणिक धोरणात पहिली ते पाचवी पुढे सहावी ते आठवी आणि नववी ते अकरावी तसेच 12 ते 15 असे टप्पे करण्यात आले आहेत.

चालू शैक्षणिक वर्षात दहावी बोर्ड कायम असले तरी 2023-24 या शैक्षणिक वर्षात दहावी बोर्ड बंद करुन अकरावी बोर्ड अस्तित्वात येणार आहे. पूर्वी एका तुकडीला दीड शिक्षक असा निकष होता, मात्र आता सरासरी हजेरी 20 मुलांची असेल तर ग्रामीण भागात 1 शिक्षक दिला जातो. त्यामुळे मुळात शिक्षकांची संख्या ही घटलेली आहे. ज्या तुकडीला सरासरी 20 हजेरी नाही, त्याला शिक्षकच दिला जात नाही. परिणामी ग्रामीण भागात शिक्षकांचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे कमी पटसंख्येच्या शाळेत जिल्हा परिषदांना शिक्षक देणे आता शक्यच होणारे नाही. परिणामी या शाळा अघोषितपणे का असेनात बंदच होणार आहेत.

बदललेला अभ्यासक्रम, परिसर विकासाचा आलेला नवीन विषय आणि प्रात्यक्षिकांवर दिली गेलेली भर हे नवीन शैक्षणिक धोरण शिक्षकाविना पुढे सरकणे शक्य नाही. परिणामी ग्रामीण भागातील शाळांना शिक्षक यापुढे मिळणे अवघड झाले आहे. 2021 च्या विद्यार्थी पटसंख्येच्या निकषाप्रमाणे राज्यातील 3037 शाळा या बंद करण्याचे नियोजन होते. त्याला विरोध झाल्याने ते थांबले असले तरी आता या शाळांना शिक्षक न मिळण्याची व्यवस्था करण्यात आल्याने शाळांची शैक्षणिक कोंडी झाली आहे. राज्य सरकारने 10 विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असणार्‍या शाळा बंद करण्याचा घाट पुन्हा एकदा घातला आहे. यासंदर्भात प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांना माध्यमाच्या प्रतिनिधींनी विचारले असता, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासंदर्भात कोणतेही शालेय शिक्षण विभागाचे पत्र मिळाले नसल्याचे त्यांनी सांगीतले.

राज्यसरकारने गोंदियातील 63, भंडारा 29, नागपूर 128, चंद्रपूर 133, गडचिरोली 384, बुलडाणा 24, वासीम 28, यवतमाळ 79, अमरावती 121, अकोला 55, वर्धा 73 या विदर्भातील 1117 शाळांना कुलूपबंद होणार आहेत. शाळांचे अन्य शाळेत समायोजन करताना विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने अध्यादेशाद्वारे स्पष्ट केले आहे. शाळा बंद करण्यासाठीची किमान पटसंख्या दहा इतकी निश्चित केली आहे. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना सात ते आठ किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. परिणामी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे.

Share