शेतकरी अभ्यास दौऱ्यात महिला शेतकऱ्यांनी घेतले आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे

गोंदिया,दि.18 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२१-२२ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम अंतर्गत उपविभागीय कृषि अधिकारी, देवरी यांचे वतीने परंपरागत शेती पध्दतीला नाविण्यपुर्ण प्रयोग व संशोधनाची जोड दिली जावी याकरीता २७ ते ३१ मार्च या पाच दिवसाचे महिला शेतकऱ्यांनासाठी अभ्यास दौरा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचा प्रामुख्य उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, राज्यातील विविध कृषि संशोधन केंद्र तसेच शेतीवर आधारीत उद्योगधंदे, प्रक्रिया केंद्र इत्यादींना भेटी घेऊन माहिती मिळविणे हा होता. प्रत्यक्ष प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून जे नाविण्यपुर्ण उपक्रम राज्यामध्ये राबविले जातात त्यांची ओळख व्हावी व ते प्रत्येक शेतकऱ्यांनी अंगिकार करुन शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून शेतकरी आर्थिकदृष्टया समृध्द व्हावे, असे प्रतिपादन देवरी उपविभागाचे उपविभागीय कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी केले. कार्यक्रमाला हिरवी झेंडी दाखवुन महिला शेतकरी सहलीला प्रस्थान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कृषि विज्ञान केंद्र खरपुडी येथील उच्च तंत्रज्ञानावर आधारीत भाजीपाला लागवड, प्रक्षेत्र भेट, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे प्रक्षेत्र भेट, ऑग्रोव्हिजन कंपनी तथा जिरॉनियम शेती मौजा देहरे जि. राहुरी यांच्या प्रकल्पास भेट, तसेच कृषि विज्ञान केंद्र, बारामती जि. पुणे येथे प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. पुढील काळात गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन शेती करणे ही काळाची गरज आहे. गोंदिया जिल्हयातील शेतकरी उत्पादक कंपन्या अधिकाधिक सक्षम होण्यासाठी “विकेल ते पिकेल" या धर्तीवर आधारीत सुक्ष्म प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी कृषि विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील. अतिशय सुंदर, नेहमी आठवणीत राहणारी ही सहल झाली. महिलांना महत्वाची माहिती तर मिळाली, पण त्याबरोबर त्यांनी या सहलीचा आनंदही घेतला. एकत्र महिला आल्यामुळे एकमेकींच्या विचारांची देवाणघेवाण झाली. आपणही असे लघुउद्योग एकत्र येऊन करुया अशी भावना त्यांचात निर्माण झाली. सहलीच्या माध्यमातुन गोंदिया जिल्हयातील शेतकरी निरनिराळया कृषि संशोधन केंद्र, प्रक्षेत्र भेट तसेच प्रक्रिया उद्योगाला भेटी देवुन तंत्रज्ञान आत्मसात करतात. कृषी विभागामार्फत कृषी विषयक उल्लेखनीय कामासंदर्भात निरनिराळे पुरस्कार देण्यात येतात त्यांचा मान महिला शेतकरी यांना मिळावा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पारंपारीक शेती बरोबरच शेतक-यांनी शेततळीमध्ये मत्स्य पालन, अळींबी उत्पादन, कुक्कुट पालन, मधुमक्षिका पालन, तंत्रज्ञानावर आधारीत भाजीपाला लागवड, बांधावर तसेच पडीत जमिनीवर फळबाग लागवड, मसाला पिके तसेच शेतीवर आधारीत प्रक्रिया उद्योग जसे- दाळ मिल, मिनी राईस मिल, मुरमुरे व पोहा उत्पादन, मिरची व हळद पावडर युनिट, पापड उद्योग यांचा जर शेतकऱ्यांनी अवलंब केला तर उत्पादनात अधिक भर पडून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षेत्रीय पातळीवर काम करणारे कर्मचारी, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच आत्मा अंतर्गत काम करणारे बि.टी.एम. व ए.टी.एम. यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share