Gondia: जिल्ह्यातील जलसाठ्यात मोठी घट, चिंता वाढली !

◼️मध्यम प्रकल्पांमध्ये 23 टक्के, लघु प्रकल्पात 35 टक्के पाणीसाठा शिल्लक

गोंदिया 18: पावसाळ्यात झालेल्या खंडीत पावसाची कसर परतीच्या व अवकाळी पावसाने भरुन काढली. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांसह प्रकल्प व तलावात मुबलक पाणीसाठा झाला. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकू लागल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांची घरघर सुरु झाली आहे. सद्यस्थितीत मध्यम प्रकल्पांमध्ये 23 टक्के पाणीसाठी आहे तर लघु प्रकल्पात 35 टक्के पाणीसाठी आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरी बंधारे कोरडे पडण्याच्या मार्गावर असून बंधार्‍यांमध्ये केवळ 4.62 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या धरणासह 9 मध्यम प्रकल्प, 22 लघु प्रकल्प व गोंदिया पाटबंधारे विभागाचे 36 मामा तलाव, तसेच दीड हजाराच्या जवळपास जिल्हा परिषदेच्या अख्यरातील जुने मामा तलाव आहेत. या तलावांची दरवर्षी मनरेगा व विविध योजनांअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून दुरुस्ती केली जाते. मात्र, योग्य दुरुस्ती व नियोजनाच्या अभावामुळे जिल्हावासीयांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे, काही मोठ्या धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी वापरले जात असले तरी बहुतांश मध्यम प्रकल्पातून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात पाण्याच्या साठ्याची स्थिती पाहता बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबांद, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी, कलपाथरी या मध्यम प्रकल्पात 23.35 टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती आहे. तर जिल्ह्यातील 20 लघु प्रकल्पांमध्ये 35.3 टक्केच पाणीसाठा आहे. त्यातच आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असताना ही परिस्थिती असल्याने संपूर्ण उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाला उपाययोजना करण्याची गरज आहे.

Print Friendly, PDF & Email
Share