पूर्व विदर्भातील १९ तालुके नक्षल प्रभावित घोषित
गडचिरोली : राज्य शासनाने पूर्व विदर्भातील गडचिराेली, गाेंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १९ तालुक्यांना नक्षल प्रभावित घाेषित केले आहे. नक्षल प्रभावित क्षेत्रांचा पुनर्विचार करून भंडारा, यवतमाळसह नांदेड जिल्ह्यांना नक्षलप्रभावित यादीतून हटविण्यात येणार आहे.
मागील पाच वर्षात या जिल्ह्यात नक्षल संबंधित काेणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा पुनर्विचार करून पुन्हा नक्षलग्रस्त क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता. २००५ च्या प्रस्तावानुसार गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांचा नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करण्यात आला होता.
मात्र आता शहरी भागातही नक्षलवादी कारवाया थांबल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने गाेंदिया जिल्ह्यातील गोंदिया, देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यांसह गडचिराेलीच्या सर्व १२ तालुक्यांचा पुन्हा नव्या यादीत समावेश केला आहे. नव्या यादीबाबत सरकारने सात दिवसांत उत्तर पाठवण्याचे आवाहन केले आहे.
चंद्रपूरचे ६ तालुके वगळले
२००५ च्या यादीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारशा, पोंभुर्णा, मूल आणि सावली यापैकी ६ तालुके यादीतून वगळण्यात आली आहेत.