पेप्सीमुळे ७ मुलांच मृत्यू
जयपूर: राजस्थानच्या सरूपगंजजवळील फुलाबाई खेडा येथे Pepsi पेप्सीने 7 मुलांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे. ब्लॉक, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय वैद्यकीय पथके फुलाबाई खेडा येथे झालेल्या या बालकांच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत. प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये विकले जाणारे शीतपेय Pepsi (पेप्सी) चे सेवन केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे मुलांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. याबद्दल डॉ. रामसिंग यादव म्हणाले की, शीतपेय आणि द्रवपदार्थ हेच प्रथमतः मृत्यूचे कारण मानले जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने गावातील काही दुकानांमधून या Pepsi पेप्सीचे नमुने घेतले असून, इतर कोणत्याही बालकाला याचा फटका बसू नये म्हणून त्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. बुधवारी एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वैद्यकीय विभाग आणि पिंडवाडा उपविभागीय अधिकारी हसमुख कुमार यांनी संपूर्ण गावात घरोघरी जाऊन पाहणी करून आजारी मुलांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. आणखी दोन मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
फुलाबाई खेड्यात 7 बालकांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. वैद्यकीय पथक गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहे. मृत्यू झालेल्या मुलांमध्ये एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुरुवारी सकाळी दोन मुलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना सरपंच विपेश गरसिया यांनी रुग्णालयात नेले. यामध्ये एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. मृत मुलांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला. तिन्ही मुलांना रक्ताच्या उलट्या झाल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला. आपल्या नफ्यासाठी 2 रुपयांची ‘पेप्सी’ बनणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकरी करत आहेत. हे शीतपेय बनवताना गुणवत्तेची काळजी घेतली जात नाही. गंजलेल्या भांड्यांमध्ये बर्फ साठवून ते तयार केले जाते. त्यामुळे पेप्सी बनवताना कोणता रंग आणि पाणी वापरले जाते, हे तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.