भाजपचे ‘मच्छर मारो’ आंदोलन
गोंदिया 08: शहरातील अस्वच्छतेचे साम्राज्य, वाढता डास, कीटकांचा होणारा प्रादुर्भाव व त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर होत चाललेला प्रश्नाबाबत नगर परिषद प्रशासकाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत निवेदने देऊन स्वच्छतेसाठी प्रयत्न होत नसल्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज, 9 एप्रिल रोजी नगर परिषदेवर मोर्चा काढून ‘मच्छर मारो’ आंदोलन करण्यात आले. दरम्यान मुख्याधिकारी व प्रशासकांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. नगर परिषदेवर प्रशासक राज सुरू असून संपूर्ण शहरात स्वच्छता व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. नियमीत स्वच्छता होत नसल्याने नाल्या तुंबल्या आहेत. या अस्वच्छतेमुळे मागील काळापासून शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे रोगांचा प्रसार होत आहे. या गंभीर बाबीकडे नगर परिषद प्रशासनाला निवेदन देवून समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे नगर परिषदेवर धडक मोर्चा काढून ‘मच्छर मारो’ आंदोलन करण्यात आले. भाजप कार्यालयातून निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने होत नगर परिषदेवर धडकला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात मच्छर मारण्याची बॅट, फवारणी मशिन व विरोधातील फलक घेवून सहभागी झाले होते. नगर परिषद प्रशासनाविरोधात नारेबाजी करीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केला. नगर परिषदेने तत्काळ लक्ष देवून प्रभागांमध्ये स्वच्छता मोहिम राबवून डासनाशक औषधी फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करणार, असा इशाराही भाजपच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.
आंदोलनात भाजपचे जिल्हा महामंत्री (संघटन) संजय कुलकर्णी, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, जिप सदस्य व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित झा, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष नारायण चांदवानी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चौधरी, विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष पारस पुरोहित, भाजयुमो शहर अध्यक्ष पलास लालवानी, माजी सभापती बंटी पंचबुध्दे, अफसाना पठाण, वर्षा खरोले, मोसमी परिहार, हेमलता पतेह, मनोहर आसवानी, जिल्हा सचिव ऋषिकांत साहू, शंभुशरणसिंह ठाकूर, संजय मुरकूटे, मनोज पटनायक, गोल्डी गावंडे, अशोक जयसिंघानी आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.