आता पोलीस शिपायालाही बनता येणार PSI: गृहमंत्री

शिर्डी 06: शासनाने एसआरपीएफ मधील पोलिसांना राज्य पोलिसात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, पोलीस शिपायास निवृत्तीपर्यंत पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पदोन्नती देण्याचाही मोठा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. दरम्यान राज्यातील पोलीसांना सुसज्ज घरे मिळाल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होणार आहे. राज्यातील पोलिसांना पुढील दोन महिन्यांत ६,८५३ घरे उपलब्ध करून देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अमंलदारांच्या ११२ निवासस्थानांचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, कोरोना काळात पोलिसांनी रस्त्यावर येऊन चोवीस तास काम केले. गृह विभाग पोलीसांना घरे व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे‌. राज्यात धार्मिक तेढ व अशांतता निर्माण होणार नाही, यासाठी काम करावे, अशा सूचनाही गृहमंत्री पाटील यांनी दिल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित, मुंबई यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share