नागपूर येथील भुमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात
नागपूर : आरोपी लोकसेवक पंकज हिरामण आंभोरे (वय ४४) पद मुख्यालय सहाय्यक उप अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय, काटोल, जिल्हा नागपूर यांनी १६ हजार रूपये लाच रक्कमची मागणी केल्याने त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या पथकाने कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, मौजा दुधाळा येथील २.८४ हे. आर. शेतजमीन ही तक्रारदार यांचा भाऊ व मुलाने मिळुन विकत घेतली. सदर शेतीचा ७/१२ वेगळा करण्यासाठी पोट हिस्सा मोजणी करीता भुमी अभिलेख कार्यालय, काटोल, जिल्हा नागपूर येथे माहे जुन २०२१ मध्ये रितसर अर्ज करून, चालान बँकेत भरून, त्याची पावती कार्यालयात जमा केली.डिसेंबर २०२१ मध्ये शेतीची मोजणी करण्यात आली. खरेदी केलेल्या जमीनीचा ७/१२ व नकाशाची पाहणी भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांनी केली असता शेतजमीन शासकीय रेकॉडला ०.०१५ आर ने कमी असल्याने शेतीचा पोटहिस्सा मोजणी होवु शकत नाही. म्हणुन शेतीची हद्द कायम मोजणी करण्यात आली. जानेवारी २०२२ मध्ये तकारदार यांना हद्द मोजणीची ‘क’ प्रत कार्यालयातुन घेवुन जाणेकरीता कळविण्यात आल्याने तकारदार हे भुमी अभिलेख कार्यालय, काटोल येथे जावुन ‘क’ प्रत प्राप्त केली. त्यानंतर तक्रारदार हे भुमी अभिलेख कार्यालय, काटोल येथे जावुन पोटहिस्सा मोजणी करीता लागणारे कागदपत्रे प्राप्त करणेकरीता कार्यालयीन फी भरून कागदपत्रे घेणे करीता गेले असता त्यावेळी कार्यालयात उपस्थित पंकज आंभोरे यांनी तक्रारदार यांना प्रकरण काय आहे विचारले वरून मोजणी दरम्यान आलेल्या तांत्रीक अडचणी बाबत सांगितले असता, पंकज आंभोरे यांनी तक्रारदार यांना पोट हिस्सा मोजणीचे काम येथील कार्यालयातच होते. याकरीता नागपूर येथील कार्यालयात जाण्याची गरज नाही. परंतु सदर कामाकरीता २५ हजार रु. द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदार यांची सदर कामाकरीता लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लोकसेवक पंकज आंभोरे यांचे विरुद्ध कायदेशिर कार्यवाही करण्याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथील कार्यालयात येवून तक्रार नोंदविली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथील पोलीस उप अधीक्षक श्रीमती योगीता चाफले यांनी तक्रारदार यांच्या तकारी प्रमाणे गोपनीयरित्या सापळा कारवाईचे आयोजन केले. आरोपी लोकसेवक पंकज हिरामण आंभोरे (४४), पद मुख्यालय सहाय्यक भुमी अभिलेख कार्यालय, काटोल, जिल्हा नागपूर यांनी तक्रारदार यांच्या शेतजमीनीचा पोटहिस्सा मोजणीची ‘क’ प्रत तयार करून देणेकरीता १४ फेब्रुवारी २०२२ रोजी २५ हजार रु. लाचेची मागणी करून तडजोडअंती १६ हजार रू. स्विकारण्याची संमती दर्शविली परंतु तक्रारदार हे तडजोडीची रक्कम घेवुन कार्यालयात गेले असता आरोपी लोकसेवक हजर येत नसल्याने आजपर्यंत रक्कम स्विकारल्या गेली नाही. त्यामुळे त्यांचे विरूध्द लाच मागणीबाबत पोलीस स्टेशन काटोल, जिल्हा नागपूर (ग्रा) येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर, मधुकर गिते अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नागपूर, पोलीस उपअधीक्षक श्रीमती योगीता चाफले, नापोशि. अनिल बहिरे, नापोशि. अमोल मेंघरे, मनापोशि. निशा उमरेडकर, मनापोशि अस्मिता मलेलवार यांनी केली.