आश्रमशाळा म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी गंगोत्री- सविता पुराम
आश्रमशाळा म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी गंगोत्रीच आहे. येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून शिक्षण, आरोग्य व संस्कार मिळातात. याचा फायदा आदिवासी पालकांनी अवश्य घ्यावा व आपल्या पाल्यांचे भविष्य घडवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सविता पुराम यांनी केले.
त्या देवरी तालुक्यातील पुराडा येथे 2 एप्रिल रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत आयोजित गुढीपाडवा व प्रवेश वाढवा कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नागपूर विभागात गुढीपाडवा व प्रवेश वाढवा हा कार्यक्रम संपूर्ण शासकीय आश्रम शाळेमध्ये घेण्यात आला. त्याअंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पुराडा येथे माजी महिला व बालविकास सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सविता पुराम यांनी आदिवासी पालकांना मार्गदर्शन करताना आश्रमशाळेचे महत्त्व व आश्रमशाळेत शिक्षणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कमल कापसे होते. त्यांनी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली व आश्रमशाळेतील उत्कृष्ट दर्जाच्या शिक्षणाची माहिती दिली. प्रसंगी शिक्षक विजय टेंभरे यांनी आदिवासीसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली.
दरम्यान, गुढीपाडवा व प्रवेश वाढवा कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील संगीत कक्षाचे व संगणक कक्षाचे उद्घाटन जिप सदस्या पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संपूर्ण देवरी प्रकल्पातून चित्रकला स्पर्धेत तृतीय क्रमांक आलेला विद्यार्थी वेदांत होळी याचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता पहिलीत प्रवेशित विद्यार्थ्यांचा आईवडील व पालकांसह पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालय देवरीचे प्रतिनिधी पी. आर. तळेगावकर, एस. एम. होळी, दुधरामजी फुलकुवर, अंगणवाडी सेविका गीता उपाध्याय, उर्मिला कुंजाम, रशिका उईके, प्रा. सोमवंशी, प्रिती खंडाते, अधीक्षक पी. एन. पडवे, एम. जी. राऊत, डी. आर. गजभीये, अरविंद बागडे, सुजाता मेश्राम आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राजेश हट्टेवार यांनी केले. संचालन दुर्गा लांजेवार यांनी केले तर आभार माया बोपचे यांनी मानले.