‘कोरोना कॉलर ट्यून’ बंद करण्याचा निर्णय
नवी दिल्ली: फोन हाती घेऊन कोणाला कॉल केला तर, सर्वप्रथम कोरोनाची सूचना ऐकू येते. बरेच लोक ही सूचना बंद करतात आणि पुन्हा नव्याने कॉल करतात. बहुतांश लोकांचा ही सूचना ऐकून वैताग होतो. कारण, ऐन घाईच्या वेळी फोन करायला उशीर होतो. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ही सूचना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा कहर देशात सुरू झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या. जनजागृतीसाठी मोहीमही राबविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला फोनवर कोणताही कॉल केल्यावर कोरोनाविषयक सूचना corona tone ऐकू येते. ही सूचना आता बंद होणार असल्याचे वृत्त आहे. ऐन महत्त्वाच्या वेळी या सूचनेमुळे फोन लागण्यास विलंब झाल्याने ग्राहकांचा खोळंबा होतो. या संदर्भात अनेक तक्रारीही टेलिकॉम विभागाला मिळाल्या होत्या.
आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आणि बहुतांश निर्बंध शिथिल झाल्याने या सूचनेचे औचित्य उरलेले नाही, असे टेलिकॉम कंपन्यांना वाटते. गेल्या 21 महिन्यांपासून ही सूचना जनजागृतीचे काम करीत आहे. मात्र, आता कोरोनाचा कहर कमी झाल्याने आणि लोकांना कोरोनाविषयक दक्षतेची पुरेशी माहिती असल्याने या सूचनेची गरज वाटेनाशी झाली आहे.