गोंदियात होणार खासदार औद्योगिक महोत्सव

गोंदिया 28: : लहान-मोठ्या उद्योगांच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने तसेच समूह उद्योगाची संकल्पना वाढीस यावी या हेतूने 26 मार्च रोजी खासदार सुनील मेंढे यांनी नागपूर येथे मध्यम, सूक्ष्म व लघु उद्योग उपक्रमाच्या अधिकार्‍यांची बैठक घेत चर्चा केली. या बैठकीत खा. मेंढे यांनी गोंदिया येथे खासदार औद्योगिक महोत्सव मानस व्यक्त केला.

मध्यम, सूक्ष्म व लघु उपक्रम आणि खादी ग्रामोद्योग च्या अधिकार्‍यांना घेऊन झालेल्या बैठकीत रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा केली गेली. भंडारा गोंदिया जिल्ह्यात छोटे-मोठे उद्योग उभारून रोजगार निर्मिती कशी करता येईल याची साधक-बाधक चर्चा झाली. समूह उद्योग ही संकल्पना पुढे आल्यास अनेक बेरोजगार स्वयंभू होऊ शकतात. त्यासाठी अधिकार्‍यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विचार करता भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीला अनुरूप असे उद्योग सुचवावेत अशा सूचना खासदार सुनील मेंढे यांनी केल्या. याच बैठकीत आगामी काळात गोंदिया येथे खासदार औद्योगिक महोत्सव घेण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.

लवकरच हा महोत्सव घेण्यात येणार असून या महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही खासदारांनी केल्या. औद्योगिक महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात काही महत्त्वपूर्ण विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला मध्यम, सूक्ष्म व लघु उद्योग उपक्रमाचे सहाय्यक संचालक राहुल मिश्रा, भाजप विदर्भ उद्योग आघाडी संयोजक गिरधारीजी मंत्री, भंडारा जिल्हा उद्योग आघाडी संयोजक तुषार काळबांधे, गोंदिया जिल्हा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, युवा मोर्चा महामंत्री हर्ष मोदी, अनुप ढोके, मनीष कापगते, अक्षय निमकर, अक्षय गिरडकर, पवन कटनकर आदी उपस्थित होते.

Share