सुगंधित तंबाखूने खाल्ली दोन पोलिसांची नोकरी; पाच लाख महागात पडले

नागपूर – सुगंधित तंबाखूचे वाहन पकडून संबंधित व्यापाऱ्याकडून पाच लाखांची तोडी करणे दोन पोलिसांना चांगलेच महांगात पडले. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी कळमना ठाण्यातील त्या दोन पोलिसांना निलंबित केले. सचिन दुबे आणि दिनेश यादव अशी या दोघांची नावे आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी या दोघांनी अग्रवाल नामक सुगंधित तंबाखू विकणाऱ्या व्यापाऱ्याचे वाहन पारडी भागात पकडले. राज्यात सुगंधित तंबाखू विकणे आणि बाळगणे प्रतिबंधित आहे. संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई करण्याऐवजी ‘दोन पेटी’ घेऊन ते वाहन मालासह सोडून दिले. मात्र, या दोन लाखांऐवजी ३० हजार मिळाल्याचे सांगून एकाने बाकीची रक्कम गिळंकृत केली. आपल्याला हलक्यात निपटवल्याचे कळाल्याने दुसरा चिडला. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा भरतवाड्यात अग्रवालचे वाहन पकडले आणि तीन पेटी घेतल्या. एवढेच नव्हे तर त्याने पोलीस ठाण्यात येऊन आपण कशी मोठी तोडी केली, त्याबाबत आरडाओरडही केली. यामुळे ठाण्यातील जुने-जाणते दुखावले. त्यांनी ही बातमी फोडली. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी गंभीर दखल घेतली. बारकाईने चौकशी करून उपायुक्त कलवानिया यांनी या दोघांचा दोषी अहवाल पोलीस आयुक्तांना कळविला. त्यानंतर शुक्रवारी या दोघांवर निलंबनाचे आदेश बजावण्यात आले.

Share