आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची मेट्रो सवारी, आयुष्यात पहिल्यांदा अनुभवला मेट्रो प्रवास
देवरी 16 : देवरी सारख्या दुर्गम भागात निवासी शाळेत शिक्षण घेत असताना साध्या वातानुकुलीत बस मध्ये बसायला न मिळणाऱ्या मुलांना चक्क वातानुकुलीत नागपूर मेट्रो मधून प्रवास करण्याचे भाग्य लाभल्यामुळे आश्रम शाळेत शिकणारे विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले. इतका सुखद व आल्हाददायकही प्रवास असू शकतो या कल्पनेने विद्यार्थी आनंदित झाले. निमित्त होते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी जि. गोंदिया येथील कार्यालयाने आयोजित केलेल्या नागपूर दर्शन सहलीचे. शासकीय आश्रम शाळेतील 230 मुला-मुलींना बदलत्या व आधुनिक नागपूरचे दर्शन घडविले तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
आदिवासी विकास विभाग, नागपूर अतंर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी जि. गोंदिया प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचे पुढाकाराने (विशेष केंद्रिय सहाय्य योजनेतंर्गत) शासकीय आश्रमशाळेतील 230 मुलां-मुलीना शैक्षणीक सहल-अभ्यास दौरा 12 मार्च रोजी नागपूर येथे आयोजीत करण्यांत आला होता. शासकीय आश्रमशाळा, एकलव्य शाळा, बोरगांव बाजार येथून अशोक बनकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक कॅम्प देवरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व बसेसना हिरवी झंडी दाखवून मुलांची सहल नागपूर येथे रवाना करण्यांत आले.
नागपूर येथील रमण विज्ञान केंद्र, मध्यवर्ती संग्रहालय, महाराजबाग, दीक्षाभुमी, स्वामी विवेकानंद स्मारक, मेट्रो प्रवास, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान असे एकुण 7 स्थळांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच मेट्रोचा आनंद घेतल्याने त्यांचा चेह-यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. सदर दौ-यातील विद्यार्थ्याचा व्यवस्थेकरीता शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी एकुण 30 सहलीत उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचा 6 बसेस जाण्यासाठी उपलब्ध करुन देण्यांत आल्या होत्या. शैक्षणीक अभ्यास दौ-यात सर्व विद्यार्थ्यानी शैक्षणीक सहलीचा आनंदाबरोबरच विद्यार्थ्याचा अध्ययन अनुभुतीत मोठया प्रमाणात भर पडली. या दौ-यामुळे आदिवासी विद्यार्थ्यामध्य नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या जिज्ञासा वृत्तीमध्ये वाढ झाली आहे, असे ब-याच विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच यापुढे असे दौरे आयोजित करावे अशी विनंती विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी यांना केली