विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या 3 पोलिसांसह 1 होमगार्ड निलंबित

प्रहार टाईम्स वृत्तसंथा

सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज गेटसमोर आंदोलन केले. या प्रकरणातील दोषी असलेल्या 3 पोलीस आणि एका होमगार्डला निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कारवाईमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

शिरवळ पोलीस ठाण्यातील एन. डी. महांगरे , बी. सी. दिघे , चालक धायगुडे व होमगार्ड नरुटे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.

प्राप्त माहिती नुसार निलंबित करण्यात आलेले चौघेजण विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर गेले. काहीही माहिती न घेता पोलिसांनी दिसेल त्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरवाजे, कड्या तोडून खोलीत घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. हा गोंधळ तब्बल एक तास सुरु होता.

पोलिसांनी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्यानंतर याचे पडसाद विद्यार्थ्यांमध्ये उमटले. शुक्रवारी सकाळी संतप्त विद्यार्थ्यांनी पोलिसांचा निषेध करत कॉलेजच्या गेटबाहेर आंदोलन केले. यावेळी विद्यार्थांनी मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तर राज्यातील पाच इतर ठिकाणी असलेल्या पशु वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी याचा निषेध नोंदवत बंद पुकारला. याचवेळी सोशल मीडियात पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे फोटो व्हायरल झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस दलातील संबंधित चौघांना तातडीने निलंबित करण्यात आले.

Share