राज्याचा अर्थसंकल्प विदर्भासाठी अपेक्षाभंग करणारा, राजकारणातील प्रतिक्रिया वाचा

गोंदिया 11: नुकताच महाराष्ट्र विधानसभेत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विशिष्ट भागासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी ठोस निर्णय, धोरण नाहीत. महिलांना खुश करण्याचे तोडके प्रयत्न करण्यात आले असून एकूणच राज्याचा अर्थसंकल्प विदर्भासाठी अपेक्षाभंग करणारा असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी केली. तर सत्ताधारी मात्र आजच्या अर्थसंकल्पाने जाम खुश असून सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे सांगत आहेत.

अपेक्षाभंग करणारा अर्थ संकल्प : आ. विजय रहांगडाले

अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या आजच्या अर्थसंकल्पात कोणत्याच विभागासाठी भरीव निधीची तरतूद नाही. वीज बिलात सवलत, कर्जमाफीची तरतूद होणार अशी अपेक्षा होती. परंतु अर्थमंत्र्यांनी अपेक्षाभंग केला आहे. विदर्भासाठी सिंचन, रस्ते यासाठी अपेक्षित निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्प हा राज्यातील जनतेचा अपेक्षाभंग करणारा असल्याची प्रतिक्रिया तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी दिली.

विदर्भासाठी भरीव तरतूद नाही : केशवराव मानकर

शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी आणि शेवटच्या घटकासाठी आजच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे एका विशिष्ट भागासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून विदर्भातील जनतेचा अर्थसंकल्पात अपेक्षाभंग झाला आहे. सर्वसामान्यांसाठी भरीव तरतूद नसल्याने विदर्भातील जनतेमध्ये नाराजीचा सूर असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी व्यक्त केले.

जनतेला भ्रमित करणारा अर्थसंकल्प : गोपालदास अग्रवाल

आजच्या अर्थसंकल्पात कोणताही ठोस निर्णय आघाडी सरकारने राज्यातील जनतेसाठी घेतलेला नाही. अनेक जुन्याच योजनांची पुर्नरावृत्ती करण्यात आली आहे. इंधन दरवाढ कमी करण्यासंदर्भात अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही. एकूणच आजचा अर्थसंकल्प सर्व सामान्य जनतेला भ्रमित करणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिली.

सर्वसामान्यांना दिलासा देणारा : आ. सहषराम कोरोटे

कृषी, रस्ते, सिंचन, महिला आदींसाठी अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी भरीव निधीची तरतूद केली आहे. नियमीत कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयाचे अनुदान व महिला शेतकर्‍यांना अधिक अनुदान व नियमित वीज बील भरणार्‍या शेतकर्‍यांना सवलतीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असून एकूणच आजचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया आमगाव-देवरीचे आमदार सहसराम कोरोटे यांनी दिली.

सर्व समावेशक अर्थसंकल्प : दिलीप बनसोड

महाराष्ट्र विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, बांधकाम, कौशल्य विकास, सिंचन, रस्ते आदी क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दिलीप बनसोड यांनी दिली.

जनतेला केंद्रबिंदू ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प : राजेंद्र जैन

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून सादर केला आहे. विशेष म्हणजे गोसीखुर्द प्रकल्प आणि गोंदियापर्यंत समृद्धी महामार्गासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी, महिला व सिंचनावर भर देण्यात आला असून उत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली.

Share