शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज मिळणार, ९११ कोटींची तरतूद

महाराष्ट्र अर्थसंकल्प :

राज्य विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज देण्यासाठी व्याज सवलत योजनेंतर्गत ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना ९११ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची घोषणी अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून केली आहे.

‘मनरेगा’ अंतर्गत ४३,९०२ सिंचन विहिरींची कामे हाती घेतली आहेत. फळबाग लागवडीसाठीच्या सुधारित धोरणानुसार काही पिकांचा नव्याने समावेश केला. रोहयोसाठी १७५४ कोटी, फलोत्पनासाठी ५४० कोटी देण्यात येतील. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार देण्याची घोषणा केली होती. पण काही आर्थिक अडचणीमुळे हे अनुदान झाले नव्हते. पण या घोषणेची वचनपूर्ती आता केली जात आहे. यामुळे २० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी २०२२-२३ या वर्षात १० हजार कोटी खर्च अपेक्षित असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी ५० हजारांऐवजी ७५ हजार अनुदान देण्यात येईल. महिला शेतकऱ्यांना अधिक अनुदान देण्यात येईल. कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी ५० कोटी देण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात जलसंपदा विभागासाठी १३ हजार २५२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

या वर्षात ६० हजार कृषी वीज पंपांना वीज देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ३४, ७८८ कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे.

Share