वसतीगृहांमध्ये कौशल विकास केंद्र सुरू होणार
गोंदिया: समाजकल्याण विभागांतर्गत येणार्या जिल्ह्यातील सर्व वसतिगृहांमध्ये आता कौशल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या दिशेने तयारी सुरू असून येणार्या दिवसांत शासकीय वसतिगृहे ही कौशल विकास केंद्र म्हणून ओळखली जातील. राज्यातील हजारो शासकीय वसतिगृहातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे.
या सर्व वसतिगृहातून विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी – सुविधा व अभ्यासासाठी पुरक वातावरण तयार व्हावे, यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेत ही सर्व शासकीय वसतिगृहे आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत प्रत्येक वसतीगृहाचा एक व्यवस्थापन आराखडा तयार करून तो 15 ते 20 दिवसात आयुक्तालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गृहपाल हे सामाजिक न्याय विभागातील महत्त्वाचा घटक आहे. आपल्या वसतिगृहातील सगळे अहवाल अद्यावत करा, स्टॉक बुक्स, सहा गठ्ठे पद्धतीनुसार सर्व अहवाल तयार करा, जेवणासाठी योग्य पद्धतीने व्यवस्था करा, स्वच्छता ठेवा, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ वाटरची व्यवस्था करा, आपल्या वसतिगृहाची तपासणी स्वतः करावी. काही समस्या असतील तर त्या आपल्या विभाग प्रमुखांमार्फत आयुक्तालयास कळवा. प्रत्येक वसतिगृहात युपीएससी, एमपीएससी, स्टॉफ सिलेक्शनचे वर्ग सुरू करा. प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यासाठी आमंत्रित करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.