जिल्हात 388 बालकांचा रुग्णवाहिकांमध्ये झाला जन्म
गोंदिया: मागील सात वर्षात पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमधील 108 रुग्णवाहिकेने एकूण 9 लाख 53 हजार 063 रुग्णांवर तातडीने औषधोपचार करून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ‘जीववाहिनी’ म्हणून ओळख असलेली ही रुग्णवाहिका बालकांचे जन्मस्थानही झाली आहे. जिल्ह्यातील 388 बालकांचा जन्म या रुग्णवाहिकेत झाला आहे.
रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्तकालीन परिस्थीतीत रुग्णांना ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार मिळावे म्हणून 2014 मध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरु करण्यात आली. 108 क्रमांक डायल करताच ही रुग्णवाहिका डॉक्टरसह दारात पोहोचते. मार्च 2014 ते डिसेंबर 2021 या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचाराची सोय या रुग्णवाहिकेने केली आहे. प्रसुतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊन माता व बालमृत्यू होण्याचा सर्वाधिक धोका असतो. अशावेळी तातडीचा योग्य उपचार महत्वाचा ठरतो. जिल्ह्यात 108 रुग्णवाहिकेतील डॉक्टर व प्रशिक्षित चालकांमुळे प्रसुतीची वेळ आलेल्या महिलांची रुग्णवाहिकेतच प्रसुती करून 388 बालकांनी जन्म घेतला.