गोंदियात रविवारी सारस मित्र संमेलन

गोंदिया: वन व वन्यजीव संवर्धन व संवर्धनात अग्रेसर भूमिका बजावणार्‍या सेवा संस्थेच्या वतीने रविवार, 13 मार्च रोजी सारस मित्र संमेलनाचे आयोजन स्थानिक हॉटेल गेट-वेमध्ये करण्यात आले आहे. या संमेलनात सारस पक्षांच्या संरक्षण व संवर्धनात मोलाची भूमिका बजावणार्‍या स्वयंसेवक व शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच यावर्षीपासून ‘सारस रक्षक’ गौरव पुरस्काराचा प्रारंभ करण्यात येणार आहे.

सेवा संस्थेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात दुर्मिळ सारस पक्षाचे संरक्षण व संवर्धनासह सारस संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे. त्याला पक्षीमित्र तसेच शेतकर्‍यांचाही उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आहे. सारस संरक्षण व संवर्धनात मोलाची कामगिरी बजावणार्‍या स्वयंसेवक व शेतकर्‍यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी सारस मित्र संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यंदा 13 मार्च रोजी या संमेलाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सरस मित्रांना गौरविण्यात येणार आहे. यासोबतच या वर्षापासून सेवा संस्थेतर्फे स्व. मुनेश गौतम यांच्या स्मरणार्थ ‘सारस रक्षक’ गौरव पुरस्काराची स्थापना करण्यात येत आहे. यासाठी दोन व्यक्तींची निवड करण्यात येणार असल्याची माहिती माहिती सेवा संस्थेने दिली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share