कलावंताला मानधन समिती सदस्यांसाठी अर्ज आमंत्रित

गोंदिया,दि.7 : कोविड जनजागृती कार्यक्रम व कलावंतांना मानधन बाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत काम करू इच्छिणाऱ्या विविध कला क्षेत्रातील कलावंतांकडून अर्ज मागविण्यात येत असून स्वेच्छेने काम करण्याऱ्यांनी आपला अर्ज १५ मार्च २०२२ पूर्वी समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे पाठविण्यात यावा.
याविषयी आज जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तुकाराम बरगे व जिल्हा प्रशासन अधिकारी करणकुमार चव्हाण यावेळी उपस्थित होते. शासनाच्या सूचनेनुसार या समितीत जिल्ह्यातील विविध कला क्षेत्रातील दहा कलावंतांचा सदस्य म्हणून समावेश करायचा आहे. समिती सदस्य म्हणून स्वेच्छेने काम करणाऱ्या कलावंतांकडून अर्ज मागवावे व त्यातून सदस्यांची निवड करावी असे या बैठकीत ठरले.
राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल एकल व समूह कलाकारांना कोविड जनजागृती कार्यक्रम व मानधन देण्याबाबत राज्याच्या सांस्कृतिक कार्य महासंचालनालयाने योजना तयार केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत जिल्ह्यातील विविध कला क्षेत्रातील दहा कलावंतांचा समिती सदस्य म्हणून समावेश करावयाचा आहे. या समितीमध्ये कार्य करू इच्छिणाऱ्या कलावंतांनी १५ मार्च २०२२ पर्यंत आपला अर्ज समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे पाठवावा. १५ मार्च नंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त अर्जांमधून दहा सदस्य निवडण्यात येतील. ही समिती कलाकार निवडीसाठी असणार आहे. समिती कामकाजाचे मानधन नसणार आहे. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी तुकाराम बरगे यांनी केले आहे.
00000

Share