आदिवासी उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षण योजना 25 मार्चपर्यंत अर्ज मागविले

गोंदिया,दि.7 : आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, गुरुद्वाराजवळ, देवरी कार्यालयाचे स्पर्धा परीक्षा माहिती व मार्गदर्शनाचे पहिले सत्र 1 एप्रिल ते 15 जुलै 2022 या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी जमातीमधील उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्रांच्या छायांकीत प्रतीसह अर्ज कार्यालयात सादर करावा.
योजनेचे स्वरुप व पात्रतेचे निकष- सदर प्रशिक्षणासाठी उमेदवार हा किमान एसएससी उत्तीर्ण असावा. उच्च शैक्षणिक पात्रताधारक व टंकलेखन/संगणक/लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. उमेदवार हा आदिवासी जमातीचा असावा. स्त्री अथवा पुरुष दोन्ही पात्र आहेत. उमेदवार हा किमान 18 वर्षे पूर्ण झालेला असावा. उमेदवार हा गोंदिया अथवा भंडारा या दोन जिल्ह्यापैकी रहिवासी असावा. सदरील उमेदवाराने वरील प्रशिक्षणाचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा.
प्रशिक्षण कालावधी तीन महिने पंधरा दिवस म्हणजेच 1 एप्रिल ते 15 जुलै 2022 असा असेल. निवड प्राप्त उमेदवारास देवरी येथे राहण्याची व्यवस्था स्वत:च करावी लागेल. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये याप्रमाणे विद्यावेतन देय आहे. वरील अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी 25 मार्च 2022 पर्यंत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, गुरुद्वाराजवळ, देवरी या कार्यालयात अर्ज सादर करावे.

Share