नागपुरात हवाला रॅकेटचा पर्दाफाश; कोट्यवधी रुपये जप्त, नोटा मोजून पोलिसांची दमछाक

नागपूर, 05 मार्च: काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज शहरात हवाला रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. कार्यालये थाटून पैशांचा काळाबाजार करणाऱ्या तीन व्यावसायिकांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींकडून 51 लाख 26 हजारांची रक्कम जप्त केली होती. ही घटना ताजी असताना आता नागपुरात हवाला रॅकेटचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी छापेमारी करत तीन जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून करोडो रुपयांची रक्कम जप्त केली आहे. नेहाल सुरेश वडालिया (वय 38, रा. कोतवाली), वर्धमान विलासभाई पच्चीकर (45) आणि शिवकुमार हरीषचंद दिवानीवाल (52, दोघंही रा. गोंदिया) असं अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावं आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये छापेमारी करत पोलिसांनी 4 कोटी 20 लाखांची रोकड जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत तिन्ही व्यावसायिकांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

गोंदियातील हवाला व्यावसायिक कोट्यवधी रुपयांची रोकड घेऊन नागपुरात येणार असल्याची गुप्त माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. शुक्रवारी दुपारी आरोपी सर्व पैसा घेऊन नागपुरात दाखल झाले होते. त्यानंतर ते कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमध्ये थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी धाडी टाकून तिन्ही आरोपींना अटक केली.यावेळी पोलिसांनी 4 कोटी 20 लाख रुपये जप्त केले. यामध्ये पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांसह इतर मूल्यांच्या नोटांचे देखील अनेक बंडल होते. त्यामुळे मशीनच्या साह्याने नोटा मोजून देखील पोलिसांची दमछाक झाली. हवालातील बरीचशी रक्कम आरोपी पच्चीकार आणि दिवानीवाल यांनी गोंदियातून आणली असून येथील काही व्यापाऱ्यांकडून ही रक्कम गोळा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Share