नागपूर : वैनगंगा नदीवर अंभोरा येथे ‘स्टेट ऑफ आर्ट’ पूल उभारणार; गडकरींनी केली पुलाची पाहणी
नागपूर-भंडारा जिल्ह्यांच्या सीमेवर प्रसिध्द तीर्थक्षेत्र असलेल्या अंभोरा येथे वैनगंगा नदीवर पर्यटकांना आकर्षित करेल असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द ‘स्टेट ऑफ आर्ट’ पूल उभारण्यात येत आहे. केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरूवार) या पुलाची पाहणी केली व निर्माणाधीन पुलाची वैशिष्ट्ये असलेल्या व्ह्यूईंग गॅलरीचीही पाहणी केली.कन्हान, वैनगंगा, आम, मुर्झा व कोलार या पाच नद्यांचा संगम असलेल्या या ठिकाणी सुमारे १२७.५४ कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात येत आहे. पुलाची लांबी ७०५.२० मीटर असून १५.२६ मीटर रुंदी आहे. वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग यासोबतच परिसरातील पर्यटकांसाठी एक विशेष पर्यटनस्थळ म्हणूनही या पुलाचा विकास करण्यात येत आहे. या पुलाच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंचे फुटपाथ पॅनोरॅमिक लिफ्ट आणि जिने यांच्यासह उभारण्यात येत असून ते ३.० मीटर रुंद केले आहेत. विदर्भातील मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या बॅकवॉटरमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येत असल्याने यावर मध्यवर्ती उंचीवर एक व्ह्यूईंग गॅलरी प्रस्तावित आहे. सेंट्रल गॅलरी आणि पायलॉन गॅलरीसह हे गॅलरी ब्रिज आरटीएलच्या तुलनेत ४० मीटरहून अधिक असून चैतन्येश्वर मंदिर परिसरासह आसपासच्या क्षेत्रातील उत्कृष्ट दृष्ये या पुलावरून पर्यटकांना पाहता येणार आहेत. तसेच डाऊनस्ट्रिममध्ये दूर असलेल्या नदीच्या दृश्यासह संपूर्ण बॅकवॉटर जलाशय परिसर आणि टेकड्यांच्या दृष्यांचाही आनंद घेता येणार आहे. प्रस्तावित स्काय बाल्कनीच्या मजल्याचा काही भाग पारदर्शक काचेचा बनवला जाणार आहे. पर्यटकांसाठी हा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव ठरेल. पुलाच्या परिसरात पर्यटनस्थळाची क्षमता असल्याने आवश्यक सुविधांबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने इतर सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या पुलामुळे नागपूर ते भंडारा गोंदिया ही वाहतूक सुगम व सुरळीत होऊन नागरिकांना सुविधा होईल. तसेच अंभोरा ते भंडारा हे अंतर पार करण्यासाठी लागणारा दीड तासाचा वेळ कमी होऊन आठ ते दहा मिनिटात पोहोचणे शक्य होणार आहे.