धानाची उचल न करणार्या राईस मिलर्सवर दंडात्मक कारवाई

गोंदिया 28 : खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला धान किमान आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ व गैरआदिवासी भागात जिल्हा पणन अधिकारी यांचे मार्फत धान खरेदी करण्यात येतो.खरीप पणन हंगाम 2021-22 अंतर्गत जिल्हा पणन अधिकारी मार्फत 35,57,160 क्विंटल व आदिवासी विकास महामंडळा मार्फत 8,53,857 अशी एकूण 44,11,017 क्विंटल धान खरेदी करण्यात आला. धान भरडाई करुन तांदूळ जमा करण्यास्तव शासन निर्णय दि.14 ऑक्टोबर 2021 रोजी निर्गमीत करण्यात आला व दोन्ही अभिकर्ता संस्थामार्फत भरडाईच्या अनुषंगाने करारनामे करण्यात आले.
धान भरडाई समन्वय समिती जिल्हाधिकारी गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली असून जिल्हा पणन अधिकारी व प्रादेशिक व्यवस्थापक,भंडारा हे सदस्य सचिव आहेत. धान भरडाई त्वरित होण्याच्या अनुषंगाने समिती दर पंधरा दिवसानी आढावा घेते. खरेदी हंगाम संपुनही अपेक्षीत गतीने गिरणी मालकांकडून धान भरडाई केली जात नसल्याचे निदर्शनास आले. भात गिरणीधारकांना वारंवार धान भरडाई करुन देण्याबाबत त्यांना अवगत करण्यात आले, चर्चाही करण्यात आली. दोन्ही अभिकर्ता संस्थामार्फत धानाच्या उचली करीता नियतन आदेशही देण्यात आले, काहींना बारदाना देखील पुरविण्यात आला,तरीही तांदूळ जमा करण्यात आला नाही. जिल्हाधिकारी गोंदिया यांनी नोटीस बजावून देखीस त्यास प्रतिसाद दिला नाही. परिणामी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांचे 15 मिलर्स व आदिवासी विकास महामंडळाकडील 15 मिलर्सवर अनामत रक्कम व बारदाना उचल केला त्यांचेकडून बारदाना रक्कम वसूल करण्याचे आदेशीत केले.
करारबध्द गिरणी मालक यांनी करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार धान भरडाई करुन तांदूळ जमा न केल्यास अशीच कारवाई करण्यात येईल. सबब धानाची उचल करुन विहीत निकषात बसणारा तांदूळ स्विकृती केंद्रावर जमा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोंदिया यांनी केले.

Share