अखेर.. मुहुर्त निघाला 13 मार्च रोजी पहिले विमान प्रवाशी उडाण घेणार
गोंदिया : दीर्घ प्रतीक्षेनंतर तालुक्यातील बिरसी विमानतळावरून व्यावसायीक वाहतुकीचा मुहुर्त निघाला आहे. 13 मार्च रोजी पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे. अशी माहिती खासदार सुनील मेंढे यांनी आज शनिवार 26 फेब्रुवारी रोजी बिरसी विमानतळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातच प्रवासी वाहतुक सुरू होणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणी असल्याने हा मुहुर्त हुकला. आता विमानतळ प्राधिकरणाने सर्व अडचणी दूर सारल्या असून उड्डाण भरण्यास बिरसी विमानतळ सज्ज आहे. नागरी विमान वाहतूक देशाच्या आर्थिक विकासाचा एक प्रमुख स्तंभ म्हणून उदयास येत आहे. केंद्र सरकारने प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला हवाई प्रवास परवडवा यासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना (आरसीएस)- यूडी-एन (उडे देश का आम नागरिक) जाहीर केली होती.
या योजनेअंतर्गत इंदोर-गोंदिया-हैदराबाद-गोंदिया-इंदोर या हवाई मार्गाला जोडणारे नेटवर्क मेसर्स बिग चार्टर प्रायव्हेट लिमिटेड (फ्लाय बिग) या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. येत्या 13 मार्च रोजी इंदोर-गोंदिया-हैदराबाद या प्रवासी विमान सेवेचा प्रारंभ नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते होणार असल्याचे मेंढे यांनी सांगीतले. विमानतळ तयार होऊन प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला गोंदिया येथील विमानतळावरून सुरुवात झालेली नव्हती. अनेक अडचणी प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने येथे होत्या. जनप्रतिनिधी म्हणून बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्धार आपण केला होता आणि तो प्रत्यक्षात आणला असल्याचे समाधान आपल्याला असल्याचे यावेळी मेंढे यांनी बोलून दाखविला.
बिरसी विमान तळाच्या सर्व अडचणी दूर करून व आवश्यक असलेल्या परवानग्या प्राप्त करून या वाहतुकीला आता परवानगी देण्यात आली आहे. 13 मार्च रोजी या विमानतळावरून पहिले प्रवासी उड्डाण होणार आहे, यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे मेंढे म्हणाले. पत्रपरिषदेला फ्लाय बिगचे मुख्या व्यवस्थापकीय संचालक संजय मांडविय, क्रियान्वय प्रमुख रतन आंभोरे, बिरसी विमान प्राधिकरणाचे संचालक के. व्ही. बैजू, डॉ. प्रशांत कटरे, गजेंद्र पुंडे उपस्थित होते.
लवकरच करनूल-चेन्नई प्रवासी सेवा
प्रवासी वाहतुकीसाठी 72 आसन क्षमता असलेला विमान राहणार आहे. 1 मार्चपासून तिकीट बुकींग सुरू होत आहे. सध्या गोंदियावरून इंदोरसाठी 1999 रुपये तिकीट राहणार आहे. इंदोर येथून सकाळी 7.10 वाजता विमान उड्डाण भरेल. बिरसी येथे 8.10 पोहचेल. 35 मिनिटांच्या विश्रांतीनंतर 8.45 वाजता उड्डाण भरेल व हैदराबाद येथे 10.15 वाजात पोहचेल. लवकरच करनूल-चेन्नई प्रवासी सेवाही सुरू होणार असल्याचे खा. मेंढे यांनी सांगीतले.