खंडणी न दिल्यास बॉम्बने उडविण्याची धमकी

भंडारा: तुमसर येथील गूळ व्यापा-याच्या घरावर पत्रक चिपकवून दोन लाखाची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. राधेश्याम बाबुलाल गुप्ता (72) असे धमकी मिळालेल्या व्यापा-याचे नाव आहे.

नाकाडोंगरी येथील रहिवासी राधेश्याम गुप्ता हे तुमसर तालुक्यात गुळाचे व्यापारी म्हणून प्रसिध्द आहेत. तालुक्यातील सर्वच लहान-मोठ्या व्यापा-यांना गुळाचा पुरवठा केला जातो. दरम्यान 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घराच्या लोखंडी गेटला एका लाल रंगाचे पत्रक चिकटवून दिसून आले. या पत्रकाची राधेश्याम गुप्ता यांनी पहाणी केली असता त्यावर 2 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली होती. सदर रक्कम तुमसर येथील बसस्थानकामधील एका सीटवर सोडून निघून जावे, रक्कम न मिळाल्यास बंदूक किंव्हा बॉम्ब ने उडवून देण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली होती. गुप्ता यांनी सदर प्रकाराची माहिती गोबरवाही पोलिसांना दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गोबरवाही पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला असून तुमसर बसस्थानक व गाव परिसरात चौकशी केली जात आहे.

Print Friendly, PDF & Email
Share