आमदारांची शेतकर्यांसह महावितरण कार्यालयावर धडक
गोंदिया: कृषीपंप व घरगुती वीज बिल अवाजवी पाठवून सर्वसामान्यांसह शेतकर्यांची महावितरण लूट करीत असून ही लूट थांबवावी, अन्यथा या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा स्थानिक आ. विनोद अग्रवाल यांनी शेतकर्यांसह शहरातील रामनगर येथील महावितरण कार्यालय गाठून दिला.
महावितरण विविध अधिभार व आकार शुल्क लावून विजग्राहकांची लूट करीत आहे. कृषीपंपाचे रिडींग न घेताच कृषीपंपधारकांना अवाजवी बिल पाठवित आहे. कृषीपंपधारक, शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या अनेक समस्या असून त्या सोडविण्या ऐवजी त्यांची लूट सुरू आहे. शेतकर्यांची प्रलंबित विज जोडणी तातडीने द्यावी, कृषी वाहिणीवर 24 तास वीज पुरवठा करावा, वीज ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करावे, आदी मागण्या केल्या असून मागण्या पुर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
वरील मागण्याचे निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता वाघमारे यांना देण्यात आले. यावेळी जिप सदस्या ममता वाडवे, दीपा चंद्रिकापुरे, आनंदा वाडीवा, वैशाली पांढरे, पंस सदस्य मुनेश रहांगडाले, हिरामण डहाट, कनिराम तावडे, शैलजा सोनवणे, विद्याकला पटले, शशिकला कात्रे, सोनुला बारेले, मीनाक्षी बारसिंगे, मंजू डोंगरे, जितेश्वरी रहांगडाले, भाऊराव उके, छत्रपाल तुरकर यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.