गोंदियातील तिघे युक्रेनमध्ये अडकले

गोंदिया: रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध छेडले आहे. त्यातच गुरुवारपासूनच युक्रेनमधील हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे. तेथे अडकलेल्या जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यासह दोन कामगाराची मायदेशी परतण्यासाठी धडपड सुरू केली आहे. यासाठी राज्य सरकार तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे.

तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथील पवन नंदलाल मेश्राम, गोरेगाव तालुक्यातील बोटे येथील उमेंद्र अशोक भोयर, मोहाडी येथील मयूर मुनालाल नागोसे हे युक्रेन येथे गेले आहेत. मयुर हा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला आहे. तर पवन व अशोक कामगार आहेत. सर्व काही सुरळीत असतानाच रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध छोडले आहे. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू करण्यात आले होते. मात्र, एअरपोर्ट बंद झाल्याने तेथे अडकलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.

जिल्ह्यातील तीघे जण युक्रेनमध्ये अडकले आहेत. मायदेशी परतण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यांनी कुटुंबीय, मित्र परिवाराशी संपर्क साधून मदतीची मागणी केली तर त्यांच्या कुटुंबीयांनी खा. प्रफुल्ल पटेल, आ. विनोद अग्रवाल आणि अन्य लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूृन आपल्याला येथून एअर लिफ्ट करा, अशी विनंती केली. मात्र, अद्यापही त्यांना कुठलीच मदत मिळालेली नाही, त्यातच आता तेथील विमानसेवा सुद्धा बंद झाल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. कुटुंबीयांनी पाठविलेले पैसे ट्रान्सफर होत नसल्याने त्यांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आम्ही येथे राहायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पवन मेश्राम याने सांगितले.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. कधी एकदा आपली मुले सुखरूप घरी परततात, याची चिंता कुटुंबीयांना लागली आहे.

Share