जिधर दम उधर हम ….! पक्ष बदलाचे वाहू लागले वारे

डॉ. सुजीत टेटे

देवरी 8 – जिल्हात जिल्हा परिषद , पंचायत समिती आणि नगर पंचायतीचे निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. नवख्या भावी उमेदवारांनी हात जोडून नमस्कार करायला सुरुवात केली असून चौकाचौकात चर्चेला उधाण आल्याचे बघावयास मिळत आहे.

येणार्‍या निवडणुकीचे चित्र काही वेगळेच असेल हे सांगणे व्यर्थ ठरणार नाही असे राजकीय क्षेत्रातील अनुभवी राजकारणीचे म्हणणे आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीत आमगाव देवरी विधानसभेत संजय पुराम यांच्या 1 वर्षापूर्वी झालेला दणदणीत पराभव कॉंग्रेसपक्षाच्या नवख्या उमेदवार सहषराम कोरोटे यांनी केला तसेच पदवीधर मतदार संघाच्या नागपुर विभागाच्या निवडणुकीत पदवीधर मतदारांनी कॉंग्रेसच्या अभिजीत वंजारी यांना निवडून देवून 62 वर्षाचा भाजप च्या गडाला सुरंग लावल्याचे चित्र डोळ्यासमोर आहे.

जिल्हापरिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाच्या तिकीट वाटपासाठी मोठी शर्यत सुरू असल्याचे चित्र बघावयास मिळत असून पुराडा जिल्हा परिषद क्षेत्रात सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाने तिकीट दिली नाही तर अपक्ष निवडणूक लढण्याचे चित्र भावी उमेदवारांच्या मोर्चे बांधणीवरुण दिसत आहे. या जिप क्षेत्रात आरक्षण सर्वसाधारण प्रवर्ग असून ओबीसी मतदार मोठ्या संख्येत असल्यामुळे निवडणूक चुरसीची नक्कीच ठरणार आहे.

देवरी नगरपंचयात च्या निवडणुकीसाठी प्रभागानुसार आरक्षण सोडत आल्यापासुन नवख्या उमेदवारानी डोके वर काढून प्रभागातील आपणच स्वयं घोषित उमेदवार म्हणून बोंबा मारण्याचे चित्र बघावयास मिळत आहे. नगरपंचायतीत आपली कारकीर्द पूर्ण केलेल्या अनुभवी माजी नगरसेकांना तसेच जागरूक आणि सुशिक्षित मतदार नवख्या उमेदवारांना ” उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग” या म्हणी ला घेऊन चर्चा करीत असल्याचे वृत आहे .

एकंदरीत देवरी नगरपंचायतीच्या निवडणुकी मध्ये तिकीट वाटपा वरुण राजकारण तापणार हे नाकारता येत नाही मागील वर्षी भाजप ने केलेली मेगा भरती आता कॉंग्रेस करत असल्याचे बघावयास मिळत आहे. यावरून “जिधर दम उधर हम ” ही उक्ती खरी ठरत असून या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर जनप्रतिनिधी अधिक सक्रिय असल्याचे दिसून येते.

Print Friendly, PDF & Email
Share